सत्ता गेल्यावर तडफडतो तो शिवसैनिक नाही, संजय राऊत स्पष्टच बोलले
सत्ता गेल्यावर तडफडत राहतो त्याला शिवसैनिक म्हणत नाही. हे स्वत:ला बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणतात. पण हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अनेक काळ सत्तेशिवाय राहिले. त्यांच्याबरोबर आम्हीही सत्तेशिवाय राहिलो, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले. राजन साळवी यांनी मिंधे गटात प्रवेश केला, याबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
ते पुढे म्हणाले की, आमच्या स्वप्नातही नव्हते की आम्ही कधी आमदार, खासदार होऊ. बाळासाहेबांनीही त्यांच्या आयुष्यातील सगळा काळ सत्तेशिवाय काढला. आम्हाला सत्ता फार उशिरा मिळाली. आम्ही सत्तेत नसतानाही बाळासाहेबांबरोबर राहिलो आणि यापुढेही राहू. सत्ता हेच सर्वस्व नाही. संकटकाळात नेते, पक्षाबरोबर राहिले पाहिजे. पक्षांतर्गत मतभेद नंतरही दूर करता येतील.
उठाव केला… उठाव केला… अशी पिपाणी वाजवणाऱ्या एकनाथ शिंदेंनाही संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. ईडी, सीबीआयला घाबरून पळालेले हे लोक आहेत. घरगडी असते तर त्यांना आमदार केले असते का? घरगडी असते तर मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती दिली असती का? घरगडी असते तर मुख्यमंत्री स्वत:कडे ठेवतात ते नगरविकास खाते दिले असते का? नगरविकास खाते मुख्यमंत्री कधी सोडत नाहीत, पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ते खाते आपल्या जवळच्या सहकाऱ्याला दिले होते. शिंदे हा खोटारडा माणूस आहे, असा घणाघात राऊत यांनी केला.
शरद पवारांबाबत नाराजी असण्याचे कारण नाही, असेही राऊत एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. एका विशिष्ट घटनेपुरती पक्षाची भूमिका मांडली, टीका केली नाही. महाराष्ट्र ज्याला गद्दार संबोधतो, ज्याने बेईमानी करून आणि शहांशी हातमिळवणी करून सरकार पाडले त्याचा सत्कार शरद पवारांच्या हस्ते करणे हे पवारांचा अपमान आहे. जो शूर योद्धा दिल्लीपुढे कधी झुकला नाही, त्या महादजी शिदे यांचा अपमान आहे. पवारांनी तिथे जाणे महाराष्ट्राला आणि त्यांच्या पक्षातल्या लोकांनाही रुचलेले नाही, असेही राऊत यावेळी म्हणाले.
तसेच शरद पवारांचा अनेकांना खोटा पुळका आला आहे. अमित शहा यांनी महाराष्ट्रात येऊन पवारांवर टीका केली. सहकार क्षेत्राचा पवारांनी बट्ट्याबोळ केला अशी टीका शहांनी केली. पंतप्रधान मोदींनी पवारांना भटकती आत्मा म्हटले होते. तेव्हा तोंडाचे डमरू वाचवणारे कुठल्या बिळात लपले होते? असा सवाल राऊत यांनी केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List