धक्कादायक… रशियन बीअर कॅनवर महात्मा गांधींचा फोटो, हिंदुस्थानात संताप
रशियातील एका बिअर कॅनवर चक्क राष्ट्रपिता महात्मा गांधींचा फोटो छापण्यात आल्याचे समोर आले आहे. त्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून महात्मा गांधींच्या नावानेच ही बियर विकली जात असल्याचे चित्र आहे. कंपनीने महात्मा गांधींचे नाव आणि त्यांचे स्केच कॅनवर प्रिंट केलेले आहे. या व्हिडीओनंतर हिंदुस्थानी नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त होत सोशल मीडियावरून कमेंटचा पाऊस पडला आहे.
दरम्यान, ही दारूची कंपनी केवळ गांधीच नाही तर प्रमुख महापुरुषांना समर्पित करून कॅन बनवते. कंपनीने आतापर्यंत कथितपणे मदर तेरेसा, नेल्सन मंडेला आणि मार्टिन ल्युथर किंग ज्युनियरनच्या नावे बिअर बनवलेल्या आहेत. नेटकऱ्यांकडून व्हायरल व्हिडीओवरून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. याआधी रशियातील निजनी नोवगोरोडमध्ये एका बारमध्ये फुटबॉलप्रेमींना हिंदुस्थानी स्वातंत्र्यसैनिकांच्या नावाने बनवलेल्या पेयावरून जगाचे लक्ष वेधले होते.
व्हिडीओत काय?
बिअर कॅनवर असलेले स्केच हे महात्मा गांधींचे स्वातंत्र्यसंग्रामातील स्केच आहे. विशेष म्हणजे या कॅनवर त्यांची सहीदेखील आहे. स्केचखाली Mahatma G. असे लिहिलेले आहे. एक हिंदुस्थानी बिअरचे कॅन हाताळताना दिसत आहे. महात्मा गांधींच्या नावावर बिअर विकत आहेत असे तो म्हणताना दिसत आहे.
गांधींनी दिला होता व्यसनमुक्तीचा संदेश
महात्मा गांधी व्यसनांच्या, दारूच्या विरोधात होते. त्यांनी आयुष्यात कायम समाजाला व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश दिला होता. दरम्यान, अशा पद्धतीने महात्म्यांचा अवमान करणे निषेधार्ह असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List