विमानात बॉम्ब असल्याचा मुंबई विमानतळावर फोन, अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानात बॉम्ब असल्याचा फसवा फोन केल्याप्रकरणी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलेने विमानतळावर दोन वेळा फोन करून दिल्लीला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा दावा केला. मात्र विमानाची तपासणी केल्यानंतर कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.
विमानतळाच्या जॉइंट कंट्रोल सेंटरच्या सहाय्यक व्यवस्थापक प्रीती माजवेलकर यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सहार पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 125, 352(4), आणि 353(1)(ब) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने 15 डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास विमानतळावरील हेल्पलाईनवर कॉल केला. दिल्लीला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचे फोनवर सांगत महिलेने विमानाचे उड्डान थांबवण्याचा आग्रह केला. यानंतर विमानतळावरील अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय सुरक्षा बैठक झाली आणि विमानाची कसून तपासणी करण्यात आली. मात्र, तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.
यानंतर महिलेने पुन्हा फोन करून विमान दिल्लीला निघाले आहे का याची चौकशी केली. याप्रकरणी पोलिसांनी सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने खोटी माहिती दिल्याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List