एकाच मेट्रोचं उद्घाटन करायला नरेंद्र मोदी पुण्यात सहाव्यांदा येणार होते, सुप्रिया सुळे यांची टीका

एकाच मेट्रोचं उद्घाटन करायला नरेंद्र मोदी पुण्यात सहाव्यांदा येणार होते, सुप्रिया सुळे यांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा बोलवून नागरिकांना त्रास होईल असे प्रशासनाने काही करु नये कारण यापूर्वी त्याच प्रकल्पाचे 5 वेळा उद्धघाटन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या कामात व्यस्त असताना राज्य सरकारने सहाव्यांदा त्याच कामासाठी त्यांना पुण्यात का बोलवले असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ज्या मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पुण्यात येणार होते, त्याचं उद्घाटन आतापर्यंत पाच वेळा झालं आहे. हा प्रकल्प एकच आहे. मात्र पुन्हा-पुन्हा केलं जात आहे. पहिल्यांदा पंतप्रधान ग्राऊंड ब्रेकिंगसाठी आले होते. नंतर पहिल्या ट्रायलसाठी आले होते. या सगळ्यांची यादी पुण्यातील पत्रकारांकडं आहे. आज मोदींचा दौरा रद्द झाला नसता तर आज सहाव्यांदा त्याच कामचां उद्घाटन झालं असतं, हे सुप्रिया सुळे यांनी निदर्शनास आणलं. हे उद्घाटन ऑनलाइनही होऊ शकतं, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पंतप्रधान हे खूप कामात असतात. त्यांच्या कार्यालयाच्या ही गोष्ट लक्षात आली नसेल. मात्र महाराष्ट्र सरकार देशातील इतक्या महत्त्वाच्या माणसाचा वेळ एकाच कामासाठी का घेतय. दिल्लीला नाव मी ठेवणार नाही, पण राज्य सरकारचं आश्चर्य वाटतं. ते एकाच कामासाठी सहाव्यांदा पंतप्रधानांना का बोलवतायत, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी केला.

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कालच्या पावसामुळं पुण्यात निर्माण झालेल्या परिस्थितीला योग्य नियोजन न करता होत असलेली विकासकामं जबाबदार असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. ही कामं करताना ड्रेनेजची पर्यायी व्यवस्था होताना दिसत नाही. त्यातून पाणी तुंबतं, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

कितीही पाऊस झाला तरी पंतप्रधानांचा कार्यक्रम होईल असं कालपर्यंत सत्ताधारी म्हणत होते. प्रशासनही तसं सांगत होतं. प्रशासन नेमका काय जादू करणार होतं माहीत नाही. त्यामुळं मीही पुण्याला निघाले होते. पण दुर्दैवानं कार्यक्रम रद्द झाला, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शहरीकरण करताना ज्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी ती घेतलेली नाही असं तज्ञांचे मत आहे. म्हणूनच सातत्याने पूरपरिस्थिती निर्माण होतेय हे दुर्दैव आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, किरीट सोमय्या अनेक वर्षांपासून एक मोठे फायटर आहेत. डर्टी डझन नावाची सीरिज त्यांनीच काढली. मी कधीच विसरले नाही. डर्टी डझन कुठे आहेत, हा एक मोठाच प्रश्न आहे. काल मी त्या डर्टी डझनपैकी एका माणसाचा फोटो अमित शाहांसोबत बघितला. ज्यांना एका वर्षापूर्वी हे डर्टी डझन म्हणत होते, तेच डर्टी डझन अतिशय विनम्रपणे अमित शाहांना भेटले. मला कौतुक दोघांचंही वाटतं. अमित शाहांचंही वाटतं, कारण त्यांचा पक्ष त्यांना डर्टी डझनपैकी एक म्हणत होता. मला गंमत त्या माणसाचीही वाटते, ज्याच्या बायकोला लढावं लागलं. त्यांच्या नातवडांना दूध मिळत नव्हतं. त्यांची बायको लढत होती. ज्यांनी ईडी तुमच्या घरी पाठवली. ते त्यांना अभिवादन करत होते, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, दोघांची विश्वासार्हता इथे पणाला लागली आहे. अमित शाहांना मला प्रश्न विचारायचा आहे की, ज्या माणसाच्या घरी तुम्ही ईडी पाठवली. ज्या माणसावर तुम्ही ईडी आणि सीबीआयच्या केसेस केल्या. त्या माणसाला डर्टी डझन तुमचा पक्ष म्हणत होता. मग तुम्ही त्याला हॅण्डशेक केलाच कसा? असा सवाल सुप्रिया सुळेंनी अमित शाह यांना केला.

ती फाईल क्लिअर आहे का, मग भाजपाने आणि अमित शाहांनी टीव्हीवर येऊन सांगितले पाहिजे की, हो, मी जो हसन मुश्रीफांवर आरोप केला; तो खोटा होता. एवढं तरी त्यांनी खरं बोलावं. आणि हसन मुश्रीफांनीही त्यांना शेकहॅण्ड करताना आम्हाला सांगावं की, हो, हे अमित शाह आहेत. त्यांनी माझी माफी मागितली आहे. माझ्या घरावर हल्ला केला, माझ्या नातवंडांना दूध दिलं नाही. माझ्या बायकोच्या अश्रुंची किंमत अमित शाहांनी आमच्या घरात येऊन फेडली म्हणून मी त्यांना हॅण्डशेक करतोय, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, अक्षय शिंदे याला भर चौकात फाशी द्यायला हवी होती. तर देशभरात शिवरायांच्या काळातील न्याय महाराष्ट्रात अजूनही दिला जातो हा मेसेज गेला असता. आणि वाईट कृत्य करणाऱ्यांना धडकी भरावी अशी शिक्षा द्यायला हवी होती. सरकारने जे काम करावे ते संविधानाच्या चौकटीत राहुन करावा. माझ्या देवेंद्र फडणवीसांकडून खूप अपेक्षा आहेत, त्यांनी असे वागणे योग्य नाही. त्या घटनेत सर्व जण शिंदे आहेत, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी फडणवीसांची नाही का? असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला आहे.

यावर सविस्तर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ही काही सिरीज नाही, हा महाराष्ट्र आहे. हा देश बंदुकीवर नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो, हे लक्षात घेणं गरजेचे आहे. देवेंद्र फडणवीस जितक्या वेळी बंदूक आमच्यावर रोखतील तितक्या वेळी आम्ही त्यांना संविधान दाखवू. यासाठी त्यांच्या गोळ्या खायची वेळ आली तरी आम्ही ते करु. फडणवीसांचे वागणे हे छत्रपती शिवराय आणि शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राला न शोभणारे आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अमित शहांनी स्वतः कबुल केले की ते स्वतःहून जिंकू शकत नाही. त्यांचे एकच लक्ष्य आहे की उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेबांना हरवायचे. त्यांनी काहीच केले नाही हाच याचा अर्थ आहे, आम्ही महाराष्ट्रातील जनतेसाठी लढतो आहोत आणि भाजपचे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना हरवण्यासाठी लढत आहेत. मराठी माणूस मोठा होतोय हे त्यांना पाहावले जात नाहीये, म्हणून त्यांच्या पराभवासाठी हे लोकं लढत आहे. 5 वर्षांपूर्वी देखील अशीच शरद पवारांना ईडीची नोटीस पाठवली होती, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.

मराठी माणसांच्या विरोधातील हे सरकार आहे, त्यांना मराठी माणसांने मोठे झालेले चालत नाही. त्यांना हरवणे शक्य नसेल तर पक्ष फोडा हे एकच गोष्ट यांच्याकडे राहिली आहे. त्यामुळे अमित शहांच्या वक्तव्याबद्दल काही वाटले नाही. ते पक्ष आणि चिन्ह घेऊन जातील पण मराठी माणसांचा स्वाभिमान कधीही घेऊन जाऊ शकणार नाही, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आंतरशालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेत रेहानला विजेतेपद आंतरशालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेत रेहानला विजेतेपद
माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब (एमजेएससी) व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित आंतरशालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेमध्ये वरळी सीफेस म्युनिसिपल शाळेचा रेहान शेख विजेता...
महाराष्ट्रात पुन्हा एकदा भगवा फडकवणार, रत्नागिरी सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक यांचा निर्धार
Nagar News – नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू
Pune News – पुण्यात मंगळसूत्र चोरणारे दोघे सराईत अटकेत, विश्रांतवाडी पोलिसांची कारवाई
Latur News – मराठा आरक्षणासाठी पती-पत्नीने उचलले टोकाचे पाऊल, विषारी औषध पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न
दप्तर आणले नाही म्हणून विद्यार्थ्याला मारहाण करत वीजेचा शॉक दिला; शिक्षकाचे क्रूर कृत्य
Bhool Bhulaiyaa 3 Teaser: प्रतिक्षा संपली… ‘मंजुलिका’ येतेय, ‘या’ तारेखेला सिनेमाचा टीझर होणार रिलीज