बाजारबुणगे आम्हाला संपवण्याची भाषा करतात, पण हिंमत असेल तर येऊन बघा महाराष्ट्र कोणाला खतम करतो; उद्धव ठाकरे यांचा अमित शहांना टोला

बाजारबुणगे आम्हाला संपवण्याची भाषा करतात, पण हिंमत असेल तर येऊन बघा महाराष्ट्र कोणाला खतम करतो; उद्धव ठाकरे यांचा अमित शहांना टोला

भाजपने हिंदुत्वाच्या नावाखाली अक्षरशः थोतांड माजवले आहे. कार्यकर्त्यांमध्ये भेसळीचा कार्यक्रम सुरू आहे. महाराष्ट्राबाहेरच्या बाजारबुणग्यांना तर महाराष्ट्र आपल्या टाचेखाली घ्यायचा आहे. त्यामुळेच ते उद्धव ठाकरे, शरद पवारांना खतम करण्याची भाषा करीत आहेत. मात्र बाजारबुणग्यांनी लक्षात ठेवावे की, महाराष्ट्र ही वीरांची भूमी आहे. आमच्या ताकदीची त्यांना कल्पना नाही. त्यामुळे हिंमत असेल तर येऊन बघा, महाराष्ट्र कुणाला खतम करतो ते दाखवून देतो, अशा कडक शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपचा समाचार घेतला.

संभाजीनगरच्या वैजापूर शहराचे माजी नगराध्यक्ष आणि भाजप नेते सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी परदेशी यांच्या हाती मनगटावर शिवबंधन बांधून, ‘मशाल’ हाती देत त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर सडकून टीका केली.

भाजपचा आता उलटा प्रवास सुरू झाला आहे. भाजपमध्ये सुरू असलेला भेसळीचा कार्यक्रम कार्यकर्त्यांना मान्य आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. वैजापूरच्या वाणी कुटुंबाने नेहमीच मनाचा मोठेपणा दाखवला आहे, असे सांगत वाणी साहेबांची निष्ठा घेऊन त्यांचे कुटुंब शिवसेनेत आल्याबद्दल त्यांनी आभारही मानले. या पक्षप्रवेशप्रसंगी शिवसेना नेते विनायक राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यासह पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपला धक्का

भाजप नेते डॉ. दिनेश परदेशी आणि त्यांची पत्नी गेल्या 15 ते 20 वर्षांपासून वैजापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष राहिले आहेत. त्यांनी याआधी विधानसभाही लढली आहे. ते याआधीदेखील शिवसेनेत होते. तर आता त्यांची शिवसेनेत पुन्हा घरवापसी झाली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर असतानाच भाजपच्या बड्या नेत्याने शिवसेनेत प्रवेश केल्याने संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे.

…तर गद्दारांना उलटे टांगले असते

वैजापूरमध्ये आता गद्दारी झाली आहे. मात्र जर आता आर. एम. वाणी असते तर गद्दारांना उलटे टांगून मारले असते, असे उद्धव ठाकरे नुकत्याच झालेल्या दौऱ्याप्रसंगी म्हणाले होते. त्यामुळे आता आपल्यालाच गद्दारांना निवडणुकीत उलटे टांगून मारायचे आहे, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी केले.

मग सगळेच बाहेर येईल…

भाजपने हिंदुत्वाच्या नावाखाली थोतांड माजवले आहे, ते माझे हिंदुत्व नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. आता जास्त बोलत नाही, मात्र निवडणुकीच्या तोफा धडधडायला लागल्या की सगळेच बाहेर येईल, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

गद्दारी गाडून निष्ठेचा भगवा फडकवा

मागील निवडणुकीत वाणी यांनीच उमेदवारी घ्यावी, अशी विनंती आपण केली होती, मात्र त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून ज्या रमेश बोरणारेंना उमेदवारी देण्यास सांगितले त्यांनीच आता गद्दारी केली आहे. त्यामुळे या गद्दारीला गाडून वैजापूरवर पुन्हा निष्ठेचा भगवा फडकवा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. ही जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो, असेही ते म्हणाले.

अमित शहा काय म्हणाले?

अमित शहा यांनी नागपूर येथे विदर्भातील कार्यकर्ता संवाद बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले होते. आपले टार्गेट उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना आणि त्यांच्या पक्षांना रोखायचे आहे, असे शहा म्हणाले होते. या दोन पक्षांसोबतच काँग्रेसलाही रोखून खाली ओढायचे आहे, असेही ते म्हणाले होते. अमित शहा यांच्या या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरे यांनी आज फोडून काढले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आंतरशालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेत रेहानला विजेतेपद आंतरशालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेत रेहानला विजेतेपद
माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब (एमजेएससी) व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित आंतरशालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेमध्ये वरळी सीफेस म्युनिसिपल शाळेचा रेहान शेख विजेता...
महाराष्ट्रात पुन्हा एकदा भगवा फडकवणार, रत्नागिरी सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक यांचा निर्धार
Nagar News – नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू
Pune News – पुण्यात मंगळसूत्र चोरणारे दोघे सराईत अटकेत, विश्रांतवाडी पोलिसांची कारवाई
Latur News – मराठा आरक्षणासाठी पती-पत्नीने उचलले टोकाचे पाऊल, विषारी औषध पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न
दप्तर आणले नाही म्हणून विद्यार्थ्याला मारहाण करत वीजेचा शॉक दिला; शिक्षकाचे क्रूर कृत्य
Bhool Bhulaiyaa 3 Teaser: प्रतिक्षा संपली… ‘मंजुलिका’ येतेय, ‘या’ तारेखेला सिनेमाचा टीझर होणार रिलीज