वेब न्यूज – अजब बंदी
>> स्पायडरमॅन
अमेरिका हा देश सध्या जगभरात चर्चेत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी खुर्ची सांभाळताच काही धडाडीचे निर्णय राबवले. या निर्णयांबद्दल मतमतांतरे असली तरी त्यांची काही पर्वा ट्रम्प करत आहेत असे सध्या तरी जाणवत नाही. ट्रम्प यांनी अमेरिकेत आता कागदी स्ट्रॉवरदेखील बंदी आणलेली आहे आणि प्लॅस्टिक स्ट्रॉच्या वापराच्या सूचना दिल्या आहेत. ट्रम्प यांनी घातलेल्या या बंदीची चर्चा सुरू असताना आता अमेरिकेतील काही शाळां त्यांनी विद्यार्थ्यांवर घातलेल्या एका अजब बंदीमुळे चर्चेत आल्या आहेत. या शाळांनी विद्यार्थ्यांना क्रॉक्स प्रकारची पादत्राणे घालून येण्यास बंदी केली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि इतर काही कारणे यामागे असल्याचे शाळांतर्फे सांगण्यात आले आहे.
अमेरिकेच्या 20 राज्यांमधील जवळपास 15 शाळांनी क्रॉक्स बंदीचा निर्णय घेतला आहे. हा नियम न पाळणाऱ्या विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात येतो आहे आणि काही ठिकाणी विद्यार्थ्यांना काही काळासाठी निलंबितदेखील करण्यात येत आहे. ही पादत्राणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत धोकादायक असून त्यांच्यामुळे विद्यार्थ्यांना दुखापत होण्याचा धोका वाढतो आहे असे कारण शाळांनी दिले आहे. या पादत्राणांना मागच्या बाजूला एक बंद असतो, तो बंद पायात न अडकवता मुलं या पादत्राणांचा वापर करतात आणि त्यामुळे घसरून पडण्याचा धोका वाढतो असेदेखील निरीक्षण शाळांनी नोंदविलेले आहे. तर ही पादत्राणे फार आकर्षक दिसत असल्याने वर्गातील विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होते असेदेखील कारण देण्यात आले आहे.
फ्लोरिडा, जॉर्जिया, अल्बामा अशा प्रमुख राज्यांमधील शाळा यात सहभागी होत आहेत हे विशेष. या बंदीसंदर्भात बोलताना काही तज्ञांनी ही पादत्राणे धोकादायक असल्याचे सांगताना डिस्नेलँडचे एस्केलेटर्स, काही प्रयोगशाळा आणि कारखान्यांमध्ये या पादत्राणांना पूर्वीपासून बंदी असल्याकडे लक्ष वेधले आहे. ही पादत्राणे सहजपणे यंत्रात अडकण्याचा धोका असल्याचे तज्ञ सांगतात. क्रॉक्स कंपनीच्या प्रवक्त्याने मात्र आमची पादत्राणे ही फक्त रोजच्या आयुष्यात सहज वापरता यावीत या हेतूने बनवली असल्याचे स्पष्ट केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List