ठसा – द्वारकानाथ संझगिरी

ठसा – द्वारकानाथ संझगिरी

क्रिकेटची  मॅच झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यांच्या लेखाची आतुरतेने वाट पाहिली जायची अशी दैवी देणगी लाभलेले हरहुन्नरी क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी गेले. आपल्या लेखणीच्या जोरावर क्रिकेट चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या संझगिरींच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना जबर धक्का बसलाय. त्यांच्या लिखाणात विव्ह रिचर्ड्सची आक्रमकता, अझरची नजाकत, राहुल द्रविडसारखा विनम्रपणा होता. खरं सांगायचं तर, त्यांची लेखणी सचिन तेंडुलकरसारखी नखशिखांत सजलेली असायची. त्यांचा प्रत्येक लेख कडकच असायला हवा, अशी लाखो चाहत्यांचीही इच्छा असायची. जी आता कधीच पूर्ण होणार नाही.

गेली चार वर्षे आजारपणाने संझगिरींचे शरीर प्रचंड थकले होते, पण मन मात्र खंबीर होते. शरीराला असह्य वेदना होत असतानाही त्यांचे लेख वाचून अंगावर शहारे यायचे. कॅन्सरशी लढण्याकरिता त्यांच्या शरीरावर केले जाणारे उपचार त्यांना जुलमी वाटायचे. पण जगण्यासाठी ते सहन करत होते, त्या उपचारांना प्रेमाने सामोरे जात होते. लेख लिहिणं त्यांच्यासाठी वाळवंटात तहानेने व्याकुळ असलेल्याला थंड पाणी मिळण्यासारखं होतं. जणू ऑक्सिजनच. लेख हे त्यांच्यासाठी आजारपणाशी लढण्याचे प्रभावी माध्यम होते. त्यांची शरीराची भूक कमी झाली होती, पण लिहिण्याची भूक जराही शमलेली नव्हती. लिखनाही जिंदगी है… लिखतेही खतम हो जाएगी… ते शेवटच्या क्षणापर्यंत लिहीत राहिले. आता फक्त त्यांचा लिहिण्याचा प्रवास थांबलाय. त्यांच्या लेखणीतून उतरलेले मन मोहणारे लेख मनात रुंजी घालतच राहतील…

संझगिरी म्हणजे जिंदादील लेखक होते. ते सर्वप्रथम क्रिकेटच्या प्रेमात पडले. मग त्याच्यासोबत संसार थाटल्यानंतर त्यांनी आपल्या हेंद्रे कॅसल या महालात क्रिकेटच्या बरोबरीने संगीत, सिनेमा आणि पर्यटन या राण्यांनासुद्धा आनंदात ठेवले. पण त्यांनी क्रिकेटबरोबर या तिघींची कधीही तुलना केली नाही. त्यांचं मत होतं की, क्रिकेटनेच मला जग दाखवलंय, क्रिकेटनेच मला मोठे केलंय. क्रिकेटची वारी करता करता मी माझ्या प्रवासात संगीत, सिनेमा आणि पर्यटनाच्या प्रेमात पडलोय.

मुंबईत जन्मलेले संझगिरी नेहमीच देवाचे मनापासून आभार मानतात. इथल्या हवेतच संस्कृती असल्यामुळे मी घडलो, वाढलो आणि मोठा झालो, असे अभिमानाने सांगायचे. मग रुईया आणि नंतर व्हीजेटीआयमध्ये उच्च शिक्षण पूर्ण केलं. पालिकेत सिव्हिल इंजिनीअर असूनही ते क्रिकेटच्या प्रेमात पडले. त्याचे मुख्य कारण म्हणजे, शिवाजी पार्क. शिवाजी पार्कमुळेच ते क्रिकेटच्या जवळ गेले. मोठमोठय़ा नेत्यांची भाषणे ऐकू शकले. त्यांना जवळून पाहू शकले. क्रिकेटपटूंना भेटू शकले. दिग्गजांचा सहवास लाभू शकला. म्हणूनच ते शिवाजी पार्कमधल्या दिग्गजांवर लिहू शकले. अशा या संझगिरींनी आपल्या लिखाणाची सुरुवात क्रिकेटपासूनच केली. त्यांच्यावर पु. ल. देशपांडे, नेव्हिल कार्ड्स यांचा प्रभाव होता. आपलीही एक वेगळी शैली असावी म्हणून त्यांनी लेखांमध्ये ताजी उदाहरणं, दिग्गजांचे दाखले देण्यास सुरुवात केली आणि हे सर्वांना हळूहळू आवडू लागलं. 1983 चा प्रुडेन्शियल क्रिकेट वर्ल्ड कपसाठी पहिल्यांदा लंडन गाठल्यानंतर संझगिरींची लेखणी सुटली ती सुस्साटच. मग त्यांनी ‘षटकार’ (मराठीतले प्रसिद्ध क्रीडा पाक्षिक) सुरू केले आणि त्यांचा क्रिकेट संपर्क अजून दृढ झाला. 1983 आणि 2011 या दोन्ही वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानी संघाला जगज्जेतेपदाचा करंडक उंचावताना पाहणाऱ्या मोजक्या क्रिकेट लेखकांपैकी ते होते. कुणाचाही विश्वास बसणार नाही, त्यांचा 1983 पासून सुरू झालेला वर्ल्ड कपचा प्रवास 2023 च्या वर्ल्ड कपपर्यंत सुरूच होता. सलग 11 वर्ल्ड कप त्यांनी कव्हर करून एक वेगळाच विक्रम स्वतःच्या नावावर रचलाय. कुणी हा विक्रम मोडेल असे वाटत नाही.

संझगिरींनी आपल्या प्रचंड लेखनामुळे 50 पेक्षा अधिक देशांची भ्रमंती केली. त्यांनी क्रिकेटबरोबर संगीत, पर्यटन आणि सिनेमांवर तब्बल 40 पुस्तके लिहिलीत. त्यांना आपल्या कारकीर्दीच्या पन्नाशीबरोबर पुस्तकांचीही पन्नाशी साजरी करायची होती, नाटके लिहायची होती, टीव्ही सीरियल्ससुद्धा लिहायच्या होत्या, 2027चा विश्वचषकही पाहायचा होता, ऑलिम्पिकही कव्हर करायचे होते. अशी बरीचशी स्वप्नं त्यांची होती. ती आता कधीही पूर्ण होणार नाहीत. वाटलं होतं, राखेतून जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे संझगिरीही कॅन्सरविरुद्धची लढाई जिंकून पुन्हा हातात पेन धरतील, पण तसं घडलं नाही. हिंदुस्थानच्या सामन्यानंतर दै. ‘सामना’त प्रसिद्ध होणारे त्यांचे लेख आता वाचायला मिळणार नाहीत. ते क्रीडा पत्रकारितेतले खरे सुपरस्टार होते, ऑलराऊंडर होते. असे लेखक शतकातून एकदाच जन्माला येतात. ते देह सोडून गेले असले तरी त्यांचे लिखाण, त्यांचे लेख, त्यांची पुस्तके अमर आहेत. ते संझगिरींचा कधीही विसर पडू देणार नाहीत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

1 एप्रिलपासून नवे शैक्षणिक वर्ष 1 एप्रिलपासून नवे शैक्षणिक वर्ष
शैक्षणिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी यंदापासूनच (2025-26) करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. याकरिता सर्व शिक्षणाधिकारी, उपसंचालक यांनी...
भाजपकडून मिंध्यांना आणखी एक धक्का; पंढरपुरातील दर्शन मंडप, स्कायवॉकच्या 129 कोटींच्या कामाची प्रक्रिया थांबविली
माझा जन्म जैविक नाही म्हणणाऱ्यांवर किती विश्वास ठेवायचा? संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांची टोलेबाजी
कोस्टल रोडला महिनाभरातच तडे, महापालिकेची तात्पुरती मलमपट्टी, व्हायरल व्हिडिओने पितळ उघडे
पंतप्रधान मोदींच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन, मराठी भाषेत भक्ती, शक्ती आणि युक्ती!
अदानी वैयक्तिक नाही, तर देशातील भ्रष्टाचाराचे प्रकरण – राहुल गांधी
दहावीचा पहिलाच पेपर फुटला, कॉपीमुक्त घोषणेचा कचरा; जालन्यातील परीक्षा केंद्रावर अभूतपूर्व गोंधळ, पालकांकडून दगडफेक