बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे हित जपायला हवे; हायकोर्टाचा शालेय, शिक्षण विभागाला झटका, प्रयोगशाळा सहाय्यकांच्या बदलीस स्थगिती
प्रयोगशाळा सहाय्यकांना अतिरिक्त जाहीर करून त्यांच्या बदलीस मंजुरी देणाऱ्या शालेय शिक्षण विभागाला उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला. या प्रयोगशाळा सहाय्यकांच्या बदलीस न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. पुढच्या महिन्यात बोर्डाच्या प्रॅक्टिकल्स देणाऱ्या विद्यार्थ्यांचे हित जपायला हवे, असेही न्यायालयाने नमूद केले.
नाशिक येथील शाळांमध्ये प्रयोगशाळेत सहाय्यक म्हणून काम करणारे सुधीर पाटील, संजय हंडोरे, संगीता पाटील व संग्राम करंजकर यांना अतिरिक्त जाहीर करून त्यांचे बदली आदेश जारी करण्यात आले. त्याविरोधात त्यांनी याचिका केली आहे. न्या. रवींद्र घुगे व न्या. अश्विन भोबे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.
पुढच्या महिन्यात बोर्डाच्या प्रॅक्टिकल्स आहेत. नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता प्रयोगशाळा सहाय्यक पदावर काम करणाऱ्या याचिकाकर्त्यांनी पुढील आदेशापर्यंत त्यांच्याच शाळेत काम करावे, असे अंतरिम आदेश देत खंडपीठाने ही सुनावणी तहकूब केली.
विद्यार्थी संख्या 201 आवश्यक
नववी व दहावी विद्यार्थ्यांची संख्या 201 असेल तरच शाळेचे प्रयोगशाळा सहाय्यक पद मान्य केले जाते. आठवीपर्यंत शाळा असल्यास प्रयोगशाळा सहाय्यक दिला जात नाही. त्यानुसार याचिकाकर्ते त्यांच्या शाळेत अतिरिक्त ठरत होते. त्याअंतर्गत त्यांची बदली करण्यात आली. त्यामुळे ही याचिका फेटाळून लावावी, अशी मागणी शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आली.
प्रॅक्टिकल्सच्या गुणांवर परिणाम
व्ही.एन. नाईक हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल, संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व संत जनार्दन स्वामी मार्ग येथील सेपंडरी स्कूल या शाळांमध्ये याचिकाकर्ते प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम करत आहेत. येथील नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या 201पेक्षा कमी आहे. त्यामुळे याचिकाकर्ते शाळांमध्ये अतिरिक्त ठरत आहेत. मात्र पुढच्या महिन्यात बोर्डाच्या प्रॅक्टिकल्स आहेत. सहाय्यकाशिवाय प्रॅक्टिकल्स होऊ शकत नाहीत. सहाय्यकाशिवाय प्रॅक्टिकल्स दिल्यास विद्यार्थ्यांना कमी गुण मिळू शकतात, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला. तो न्यायालयाने ग्राह्य धरला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List