प्लेलिस्ट – ये शहर बडा पुराना है

प्लेलिस्ट – ये शहर बडा पुराना है

<<< हर्षवर्धन दातार >>>

हिंदी चित्रपटगीतांमध्ये अनेकदा शहरांचा, गावांचा उल्लेख दिसून येतो. कधी ती मजेशीर असतात तर कधी त्या शहराच्या भावना, संस्कृती दर्शवणारी असतात. अशा गाण्यांतून फेरफटका मारत त्या-त्या शहराची गाण्यांमधून केलेली ही सैर.

भारत देश हा अनेक प्रांत, राज्य, शहर आणि खेड्यांचा देश आहे. त्यात अनेक मिजाज, जायके यांचा समावेश आहे. हिंदी चित्रपटातील आपले प्रदेश, शहर आणि गावांचा उल्लेख असणारी गाणी. त्या अनुषंगाने तेथील जीभ चाळवणारे पदार्थही तितकेच लोकप्रिय. काही गावातून फेरफटका मारून एक आढावा घेऊया अशा गाण्यांचा.

या विषयाचा विचार करताना सर्वप्रथम आठवतं ते ‘आशीर्वाद’ (1968) मधील सुप्रसिद्ध ‘रेलगाडी’ हे अभिनेता अशोक कुमार यांनी गायलेले आगगाडी गीत. हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय यांच्या शब्दांना रेल्वेगाडीच्या ठेक्याची चाल लावली आहे वसंत देसाई यांनी. आगगाडी लहान मुलांना अनेक शहरांची सहल घडविते. हुप्कल-दिंडीगुल ही मजेशीर नावांची शहरं गाण्यात हजेरी लावतात. अशोक कुमारचा अभिनयही लाजवाब. गाणं ऐकताना कोळशाची वाफेवर चालणारी इंजिन आपल्या डोळ्यासमोर येतात. दुश्मन (1972) मधील ‘देखो देखो बायोस्कोप’ या गाण्यात भारतातील दिल्ली, कोलकाता, आग्रा, लखनौ, मुंबईचा उल्लेख येतो.

भौगोलिक भारताचा मुकुटमणी अर्थातच निसर्गसौंदर्याने नटलेलं कश्मीर. अनेक शतकांपूर्वी अमीर खुसरोनी म्हटलंच आहे, ‘गर फिरदोस बर रहे झमीन अस्त, हमीं अस्तो, हमीं अस्तो.’ अर्थात, या पृथ्वीवर जर स्वर्ग असेल तर तो इथेच आहे, इथेच आहे. बेमिसाल (1982) मध्ये बक्षी साहेबांनी कश्मीरचं अतिशय सुरेख वर्णन केलं आहे. ‘कितनी खूबसूरत ये तसवीर है, ये कश्मीर है.’ राहुल देव बर्मनच्या संगीतामध्ये संतूर या कश्मिरी वाद्याचा सुरेल उपयोग आपल्याला ऐकू येतो. चित्रीकरणही डोळ्यांना अतिशय सुखावह. पडद्यावर अमिताभ, राखी आणि विनोद मेहरा हे त्रिकुट.

ईस्ट इंडिया कंपनीच्या नावाखाली ब्रिटिशांनी भारतावर आपली हुकूमत ज्या ठिकाणाहून प्रारंभ केली ते कोलकाता! व्यापार, राजकारण आणि सांस्कृतिक धरोहर याकरिता प्रसिद्ध असलेलं कोलकाता हे साहित्य आणि संगीत याचं माहेरघर म्हणून ओळखलं जायचं. हावडा ब्रिज (1958) चित्रपटात ओ. पी. नय्यर यांच्या टांगा ठेक्यावर रफी साहेबानी गायलेले टांगेवाला ओमप्रकाशवर चित्रित ‘ईट की दुक्की पान का इक्का, सुनो ये कलकत्ता है’ हे तालेवार गाणं. यात आपल्याला हुगळी नदीवरचा विख्यात हावडा ब्रिज, तेथील ट्राम यांचं दर्शन घडतं.

नजाकत, तहजीब आणि नवाबी वातावरणाकरिता प्रसिद्ध बहुसांस्कृतिक केंद्र लखनऊ. अवध प्रांताचा नवाब वाजिद अली शाहने लखनऊला उत्तरेतील संगीत, साहित्य आणि कला क्षेत्रांचं एक महत्त्वाचं केंद्र बनवण्यात मोठा हातभार लावला. शहर प्रसिद्ध आहे ‘टुंडे कबाब, इमरती आणि मक्खन मलाई’ या नवाबी खानपान खाद्यपदार्थांकरिता. चौदवी का चांद (1960) या चित्रपटात शायर शकील बदायुनीनी संपूर्ण लखनऊ शहर आपल्या शब्दात रेखाटलं आहे ‘ये लखनऊ की सरजमीन’ या गीतात. पालकी (1967) या दुसऱ्या चित्रपटात ‘ए शहरे लखनऊ’ या गाण्यातून या नवाबी शहराची तुलना स्वर्गाशी केली आहे. ‘मेरे लिये बहार भी तू, गुलबदन भी तू, परवाना और शमा भी तू और अंजुमन भी तू’ या शब्दातून लखनऊचे सौंदर्य झळकते. दोन्ही गाण्यांचे शब्दकार शकील बदायुनी आहेत. तसंच गायलंसुद्धा रफीनी. गंमत म्हणजे दोन्ही गाणी चित्रपटाच्या सुरुवातीला नामावलीच्या वेळी आहेत.

देशाची आर्थिक राजधानी आणि भारताचा समुद्री प्रवेशद्वार ‘गेटवे ऑफ इंडिया’ मुंबई. प्रयत्न करणाऱ्याला, कुठलंही काम करण्याची तयारी असणाऱ्या सामावून घेणारी मुंबई पूर्वीची बॉम्बे. चित्रपटातून मुंबई सर्वांना दिसली ती ‘ए दिल है मुश्किल जीना यहाँ’ या CID (1956)मधल्या जॉनी वॉकरवर चित्रित सुप्रसिद्ध गाण्यातून. पुढे डॉन (1978) मध्ये किशोर-अमिताभ द्वयीनी ‘ये है बम्बई नगरिया तू देख बबुआ’ या मजेशीर गाण्यातून पुन्हा एकदा मुंबई दर्शन घडवलं. अफाट गर्दी आणि धावपळ यामुळे होणाऱ्या विचित्र दुर्घटना यावर एक चपखल बसणारं गाणं अनेक वर्षांपूर्वी आलेल्या हादसा (1983) चित्रपटातल्या ‘ये बम्बई शहर हादसों का शहर है’ अनिश्चितता दर्शवतं. ‘मुंबईचा जावई’ या मराठी चित्रपटावरून घेतलेल्या ‘पिया का घर’ (1972) या हिंदी चित्रपटात ‘बम्बई शहर की तुझे सैर करा दू’ गाण्यातून अनिल धवन, जया भादुरीला मुंबई दाखवतो. सत्तरच्या दशकातील मोकळी ढाकळी मुंबई आणि तिचे रस्ते बघून मन सुखावतं.

आपली राजधानी दिल्लीचे ऐतिहासिक महत्त्व दर्शवणारी चांदणी चौक, लाल किल्ला जामा मशीद, कुतुब मिनार, मुगल बादशाह हुमायूचा मकबरा… अशी अनेक स्थळं जी सांगतात कहाण्या, विराण्या. चांदणी चौक (1954) चित्रपटात ‘कुतुब मिनार पे चढ़ कर’ या विनोदी गाण्यातून या महत्त्वपूर्ण शहराची एक झलक मिळते. पंजाब हा सरळ मनाच्या, पण रांगड्या लोकांचा प्रांत. सपने सुहाने (1961) मध्ये सलील चौधरीनी ‘नाम मेरा निम्मो, मुकाम लुधिआना’ हे लोकगीतावर लताजीकडून एक ठसकेदार नृत्यगीत गाऊन घेतलं.

कुठलंही नाव नसलेल्या भारतातील गावाचं चित्र आपल्या डोळ्यापुढे उभं केलं आहे. रवींद्र जैननी चित्तचोर (1976) यातील येसूदासनी गायलेल्या सुरेल आणि कर्णप्रिय ‘गोरी तेरा गांव बडा प्यारा’ गाण्यात. तसंच काहीसं गाणं आहे CID (1956) चित्रपटातील शमशाद बेगम यांचं ‘बुझ मेरा क्या नाम रे, नदी किनारे गांव रे.’

अशा या सगळ्या ऐतिहासिक शहरांनी, गावांनी आणि नागरिकांनी सार्थक केलेला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक भारताचा गौरव होतो ‘जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा’ या राजेंद्र कृष्ण-हंसराज बहल-रफी व कोरस जोडीच्या डोळ्यात आनंदाश्रू आणणाऱ्या सिकंदरे आझम (1965) गाण्याने. राजेंद्र कृष्ण यांनी अर्थपूर्ण शब्दातून वैभवशाली, गौरवशाली आणि बलशाली भारत आपल्यापुढे उभा केला आहे.

[email protected]
(लेखक संगीत अभ्यासक आहेत.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement