अखेर मनोज जरांगेंचा पत्ता ओपन, मंत्रिमंडळ विस्तार होताच अंतरवालीमधून केली मोठी घोषणा
रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला, त्यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला सरकारनं स्वतंत्र आरक्षण दिलं, मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे, ते अजूनही आपल्या मागणीवर ठाम आहेत. तर दुसरीकडे ओबीसी समाजाकडून या मागणीला विरोध होत आहे.
दरम्यान मंत्रिमंड विस्ताराच्या दुसऱ्याच दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला आहे. मंत्र्यांचा शपथविधी झाला, आता उद्या पत्रकार परिषद घेऊन आमरण उपोषणाची तारीख सांगणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, ज्यांना स्वतःच्या मनाने सामूहिक आमरण उपोषणाला बसायचं, त्यांनाच उपोषणाला बसवलं जाईल, उपोषणाला बसण्यासाठी कोणावरही बंधन घातलं जाणार नाही. आमरण उपोषणाला कोणी नाही जरी बसलं, तरी मी एकटाच बसणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, मी जर उपोषणाला बसा म्हटलं तर घराघरांमधून मराठे उपोषणाला बसतील, अशा इशाराही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
सरकारने या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. सरकार या आधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न नक्की सोडवेल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलल्या प्रमाणे मराठा आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.
दरम्यान काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, मात्र या मंत्रिमंडळातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यावरून भुजबळांनी नाराजी व्यक्त केली. भुजबळांना डावलण्यात आलं, यावर देखील जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही? हा आमचा प्रश्न नसून मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्याच आम्हाला देणं घेणं नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List