मंत्रिपद न मिळाल्याने मिंधे गटातील आमदारांमध्ये तीव्र नाराजी; आमदार नरेंद्र भेंडेकर यांचा उपनेते, समन्वयकपदाचा राजीनामा
मंत्रिमंडळ विस्तारात मिंधे गटातील अनेकांना संधी मिळालेली नाही तसेच अनेकांचा पत्ता कट झाला. त्यामुळे मिंधे गटात राजीनामा सत्र सुरू झाले आहे. आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मंत्रिपद न मिळाल्याने मिंधे गटाच्या उपनेते व विदर्भ समन्वयकपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. इतर अनेक आमदारही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून टोकाचा निर्णय घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजते.
मिंधे गटातील काही आमदार मंत्रिमंडळ विस्तारात अक्षरशः गुडघ्याला बाशिंग बांधून होते, मात्र त्यांना संधी मिळाली नाही. अडीच वर्षांनंतर संधी देऊ असे सांगूनही त्यांचा पहिल्या टर्मसाठी आग्रह होता. त्यात भोंडेकर यांचा समावेश होता, मात्र मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी मिंधे गटाच्या पदांचा राजीनामा दिला. भोंडेकर यांनी मिंधे गटाच्या बाजूने यापुढे कोणतीही भूमिका मांडणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. आमदारकीचा राजीनामा मात्र त्यांनी दिलेला नाही. मिंध्यांबरोबर सुरतला पळालेल्या पहिल्या दहा आमदारांमध्ये भोंडेकर यांचा समावेश होता.
माजी मंत्री दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत यांनाही नव्या मंत्रिमंडळात पुन्हा स्थान न मिळाल्याने त्यांनीही शपथविधीकडे पाठ फिरवत नाराजी व्यक्त केली. मागाठाणेचे मिंधे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनीही मंत्रिपद न मिळाल्याने माध्यमांसमोर उघड नाराजी व्यक्त केली, मात्र राजीनाम्याबाबत ब्रसुद्धा काढला नाही.
वाचाळवीरांच्या वाट्याला भोपळा
भारतीय जनता पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडल्यासारखे दाखवायचे किंवा भाजप विरोधकांवर शिंतोडे उडवायचे म्हणजे आपल्या पदरात मंत्रिपद पडेल अशा आशेवर राहिलेल्या वाचाळवीरांनाही मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळाले नाही. गोपीचंद पडळकर, चित्रा वाघ, प्रवीण दरेकर, रवी राणा, सदाभाऊ खोत यांच्या वाट्याला मंत्रिमंडळ विस्तारात भोपळाच आला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List