Ratnagiri News – जिंदल कंपनीत वायुगळती; 60 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली, काही विद्यार्थी गंभीर
रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील जिंदल कंपनीमध्ये एलपीजी वायुगळती झाली. वायुगळतीमुळे माध्यमिक विद्यामंदिर जयगड शाळेतील 60 विद्यार्थांची प्रकृती बिघडली आहे. अनेक विद्यार्थ्यांना श्वास घेण्यास त्रास, चक्कर आणि काही विद्यार्थ्यांना उलटी झाली. या सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे.
सदर घटना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. जयगड येथील जिंदल कंपनीत एलपीजी गॅसची वायुगळती झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. जिंदल कंपनी पासून जवळ असलेल्या माध्यमिक विद्यामंदिर जयगड मधील विद्यार्थ्यांना याचा सर्वात मोठा फटका बसला. विद्यार्थ्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तसेच काही विद्यार्थी चक्कर येऊन पडले तर, काही विद्यार्थ्यांनी उलट्या केल्या. सायंकाळी उशीरापर्यंत विद्यार्थ्यांना रूग्णालयात दाखल करण्यात येत होते. रूग्णालयाच्या परिसरात पालक आणि जयगड मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने जमावाने संताप व्यक्त केला. “उद्या जिंदल कंपनीला या घटनेबाबत जाब विचारणार आहोत. जिंदल कंपनीने वायुवाहतूक बंद करावी,” अशी मागणी जयगडच्या सरपंच फरजाना डांगे यांनी केली आहे.
वायुगळतीची घटना घडल्यानंतर जिंदल कंपनीकडून कोणताही अधिकारी माहिती देण्यासाठी पुढे आला नाही. कंपनीविरोधात जमाव संतप्त झाला आहे. कंपनीच्या प्रदुषणाचा दुष्परिणाम आम्हाला भोगावा लागत असल्याचा संताप जमावाने व्यक्त केला. “ज्या विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे,” अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List