Ganeshotsav 2024 – गौरी पूजन का करावे? जाणून घ्या कहाणी…

Ganeshotsav 2024 – गौरी पूजन का करावे? जाणून घ्या कहाणी…

>> योगेश जोशी

गौरीपूजन वा महालक्ष्मी पूजन हे आपल्या संस्कृतीत पूर्वापार चालत आले आहे. हे भाद्रपद महिन्यातील एक महत्त्वाचे व्रत आहे. काही ठिकाणी याला महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात. पुराणकथांमध्ये गौरी हे पार्वतीचे एक नाव आहे. ज्येष्ठगौरी आणि कनिष्ठगौरी अशा दोन देवींचे पूजन या प्रसंगी केले जाते. काही ठिकाणी ज्येष्ठा आणि कनिष्ठा यांच्या मध्ये गणपती अर्थात बुद्धीच्या देवतेची स्थापना केली जाते.

गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे. गौरीच्या डाव्या हातात बीजपूरक आहे, केसांवर फुलांची वेणी आहे, असे गौरीचे वर्णन आढळते. एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्यासाठी तिची प्रार्थना केली. गौरीने असुरांचा संहार केला व शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने आपापल्या सौभाग्य प्राप्त झाले म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या, अशी मान्यता आहे. लक्ष्मी वा गौरीच्या मांडणीत विविधता असली तरी मूळ हेतू धान्य लक्ष्मीच्या पूजेचा,सुख समृद्धी आणि अष्टलक्ष्मीच्या प्राप्तीचा आहे.

गौरींच्या मांडणीच्या विविध पद्धती
स्थळपरत्वे गौरींच्या पूजेंची पद्धत आणि परंपरा बदलल्या आहेत. काही कुटुंबात गौरींचे मुखवटे असतात, तर काही कुटुंबात परंपरेनुसार पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा करतात. काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडींनाच साडी चोळी नेसवतात आणि त्यांची पूजा करतात. काही घरांत धान्यांची रास म्हणजेच गहू, तांदूळ, ज्वारी, हरभरा, डाळ इत्यादींपैकी एकदोन धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात. बाजारात पत्र्याच्या, लोखंडी सळयांच्या किंवा सिमेंटचे कोथळे मिळतात. त्यावर मुखवटे ठेवतात आणि कोथळ्यांना साडी चोळी नेसवतात. सुपात धान्याची रास ठेवून त्यावर मुखवटा ठेवतात किंवा गहू आणि तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यांवर मुखवटे ठेवून पूजा करतात. तेरड्याचीही गौर असते. विविध रूपांत अनेक घरांत गौरी/महालक्ष्मी येतात.काही ठिकाणी या गौरी/महालक्ष्मी किंवा सखी-पार्वतींसह त्यांची मुलेही (एक मुलगा आणि एक मुलगी) मांडतात. कोणी धातूची लक्ष्मीची प्रतिमा करून पूजतात, कोणी मातीची बनवितात तर कोणी कागदावर देवीचे चित्र काढून त्याची पूजा करतात. या पूजेवेळी गुरुजींकडून किंवा पूजा करणाऱ्या महिलांकडून गौरी किंवा महालक्ष्मीची कहाणी सांगितली जाते. त्याबाबत जाणून घेऊ.

आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण रहात होता. पुढं एकदा भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या. घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. आईला सांगितलं, आई, आई, आपल्या घरी गौर आण! आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजा केली पाहिजे, घावनघाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही बापाजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौर आणीन.

मुलं तिथून उठली, बापाकडे आली. बाबा, बाबा, बाजारात जा. घावनघाटल्याचं सामान आणा. म्हणजे आई गौर आणील. बापानं घरात चौकशी केली. मुलांचे म्हणणे समजून घेतले. परिस्थितीमुळे मनात फार दु:खी झाला. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही. गरीबीपुढं उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला, इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं हकीकत सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं. बायकोनं दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्या बाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवर्‍यानं आजी म्हणून सांगितलं.

बायको घरात गेली आणि अंबिलाकरता कण्या पाहू लागली. तो मडकं आपलं कण्‍यांनी भरलेलं दृष्टीस पडलं. तिला आश्चर्य वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवर्‍याला सांगितली. त्यालाही आनंद झाला. पुढं पुष्कळ पेज केली, सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळी जण आनंदानं निजली. सकाळ झाली तशी म्हतारीनं ब्राह्मणाला हाक मारली. मुला, मुला मला न्हाऊ घालायला सांग, म्हणाली, घावनघाटलं देवाला कर. नाही काही म्हणू नको, रडगाणं काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला बायकोला हाक मारली, अंग अंग, ऐकलंस का, आजीबाईला न्हाऊ घाल, असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. भरपूर गूळ मिळाला. मग सगळं सामान आणलं: ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलंबाळंसुद्धा पोटभर जेवली. म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, आजी आजी, दूध कोठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता उठ आणि जितक्या गाईम्हशी पाहिजे असतील तितके खुंट पूर, तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाईम्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्यांच दूध काढ! ब्राह्मणानं तसं केलं, गाईम्हशींना हाका मारल्या त्या धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाईम्हशींनी भरून गेला. ब्राह्मणांने त्यांचं दूध काढलं.

दुसर्‍या दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला, मुला, मला आता पोचती कर! ब्राह्मण म्हणू लागला, आजी आजी, तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोचती कसे करू? तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल? म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठागौर म्हणतात ती मीच! मला आज पोचती कर! ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असंच वाढावं असा काही उपाय सांग! गौरीनं सांगितलं, तुला येताना वाळू देईन, ती सार्‍या घरभर टाक, हांड्यावर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक. असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही.

ब्राह्मणानं बरं म्हटल. तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं. दोन खडे घरी आणावे. ऊन पाण्यानं धुवावे. जेष्ठागौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांनी स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावनगोड तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीची ओटी भरावी. जेवू घालावं. संध्याकाळी हळदीकुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल. सतत संपत्ती मिळेल. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

अशाप्रकारे ही गौरी आवाहन, पूजन आणि विसर्जनाची कथा सांगण्यात येते. आता त्यात काळानुरुप काही बदल झाले आहेत. पूर्वी एकत्र कुटुंबपद्धतीत पूरणावरणाचा नेवैद्य, 16 प्रकारच्या भाज्या, पंचपक्वाने यांचे जेवण बनवण्यात येत होते. आता विभक्त कुटुंबपद्धतीमुळे घरात एकच महिला असल्यास एवढे जेवण बनवणे शक्य नसते. बनवले तरी ते संपत नाही. त्यामुळे कालानुसार काही बदल करणे गरजेचे आहे. एवढी पक्वान्ने बनवण्याऐवजी गोडाधोडाचे जेवण बनवले तरी चालते. काळानुसार काही बदल गरजेचे आहे. मात्र, कोणतेही पूजन, व्रत,सण किंवा उत्सव साजरा करताना त्यामागील कारण समजून घेत ते साजरा करणे गरजेचे आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अक्षय शिंदेच्या मृत्यूचे खरे कारण समोर, 7 तास शवविच्छेदन; अहवालामध्ये मोठा खुलासा काय? अक्षय शिंदेच्या मृत्यूचे खरे कारण समोर, 7 तास शवविच्छेदन; अहवालामध्ये मोठा खुलासा काय?
बदलापूरमधील चिमुकलींवर झालेल्या अत्याचारामधील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाला. सोमवारी तळोजा कारागृहातून बदलापूरकडे नेताना पोलिसांनी सेल्फ डिफेन्समध्ये अक्षय...
चोर समजून दोन अल्पवयीन मुलांना विवस्त्र करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घेतली दखल
Video – पेन्शनसाठी 70 वर्षीय वृध्द महिलेची पायपीट, मन हेलावून टाकणारा व्हिडीओ व्हायरल
हिंदी बिग बॉससाठी मराठी बिग बॉस लवकर संपणार? मराठी प्रेक्षक भडकले…
काहीही काम न करता वर्षाला कमावतोय 6 कोटी, तुम्हालाही आवडेल असं काम करायला? वाचा सविस्तर…
इस्रायलने हिजबुल्लाहच्या कंमाडरचा केला खात्मा, संयुक्त राष्ट्रसंघाने व्यक्ते केली चिंता
छत्री घेऊनच बाहेर पडा, पुढच्या पाच दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा