मोदी निघाले, ट्रम्प विसरले; बेकायदा हिंदुस्थानींच्या हाता-पायात अमेरिकेने पुन्हा बेड्या घातल्या, शिखांच्या पगड्या उतरवल्या
अमेरिका दौऱ्यावर असताना बेकायदा स्थलांतरितांना हिंदुस्थानात आणण्यासाठी तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. या नागरिकांना अमिष दाखवून, फसवून आणल्याचे मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर म्हणाले होते. मात्र मोदींची पाठ वळताच अमेरिकेने पुन्हा एकदा हिंदुस्थानी नागरिकांच्या हातात बेड्या घालून आणि हातात साखळदंड बांधून त्यांना मायदेशी पाठवले आहे.
116 हिंदुस्थानी नागरिकांना घेऊन अमेरिकेचे लष्करी विमान शनिवारी रात्री अमृतसह येथे उतरले. या विमानामध्ये पंजाबचे 65, हरयाणाचे 33, गुजरातचे 8, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानचे दोन-दोन आणि हिमाचल प्रदेश, गोवा व जम्मू-काश्मीरचा प्रत्येकी एक व्यक्ती होता. गेल्यावेळेप्रमाणे यावेळीही हिंदुस्थानी नागरिकांच्या हातात बेड्या घालण्यात आल्या होत्या, पायात साखळदंड बांधण्यात आले होते. एवढेच नाही तर शिखांच्या पगड्याची उतरवण्यात आल्या होत्या.
अमृतसरच्या विमानतळावर उतरल्यानंतर दलजित सिंग नावाच्या एका तरुणाने आपला अनुभव सांगितला. आमचे पाय साखळदंडाने बांधले होते. हातामध्ये बेड्या घातल्या होत्या, असा दावा दलजितने केला. दलजित होशियारपूरचा रहिवासी असून तो डंकी रूटने अमेरिकेत गेला होता. त्याची पत्नी कमलप्रीत कौर हिने माझ्या पतीला फसवून डंकी रूटने नेण्यात आरोप केला. एजंटने थेट फ्लाईटने दलजितला अमेरिकेत नेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याने डंकी रुटने त्याला अमेरिकेत नेले.
विमानातील सर्वच पुरुषांच्या हाता-पायात बेड्या होत्या. फक्त महिला आणि लहान मुलांना सूट देण्यात आली होती. अमृतसर विमानतळावर विमान उतरले तेव्हा शीख युवकांच्या डोक्यावर पगड्याही नव्हत्या. अनवानी पायाने हे तरुण विमानतळवर उतरले. यातील अनेक जण मोठ-मोठ्याने रडतही होते.
दरम्यान, याआधीही अमेरिकेने 104 हिंदुस्थानी नागरिकांना हाता-पायात बेड्या घालून आणले होते. त्यावेळी सरकारवर टीकेची झोड उठली होती. मोदींच्या अमेरिका दौऱ्यावेळीही हाच मुद्दा चर्चेत होता. ट्रम्प यांच्या भेटीवेळी मोदींनी हा मुद्दा उपस्थित केला असावा. मात्र मोदींची पाठ वळताच अमेरिकने पहिलाच कित्ता पुन्हा गिरवला. आता तिसरे विमानही रविवारी अमृतसरला लँड होणार असून यातून जवळपास 157 बेकायदा हिंदुस्थानी नागरिकांना मायदेशी पाठवण्यात येणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List