शहीद जवानाच्या मुलाची हरियाणा क्रिकेट संघात निवड
पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या एका जवानाच्या मुलाची क्रिकेटच्या अंडर-19 संघात निवड झाली आहे. पुलवामा हल्ल्यात हौतात्म्य आलेल्या विजय सोरेंग यांचा मुलगा राहुल सोरेंग याची हरियाणाच्या 19 वर्षांखालील संघात निवड झाल्याची माहिती, हिंदुस्थानचा स्टार माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने दिली आहे. राहुल हा सेहवाग याच्या शाळेत शिक्षण घेतो.
पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. पुलवामा हल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची जबाबदारी वीरेंद्र सेहवाग याने आपल्या खांद्यांवर घेतली होती.
काल (दि. 14) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सेहवाग याने शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आणि राहुल सोरेंग याच्या निवडीची आनंदाची बातमीही दिली. ‘वीर जवानांच्या बलिदानाची भरपाई कुठल्याही पद्धतीने होऊ शकत नाही. मात्र, हुतात्मा विजय सोरेंग यांचा मुलगा राहुल सोरेंगे आणि हुतात्मा राम वकील यांचा मुलगा अर्पित 5 वर्षांपासून सेहवाग इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत आहेत. राहुलची नुकतीच हरियाणाच्या अंडर 19 संघात निवड झाली आहे’, असे सेहवाग याने पोस्टमध्ये नमूद केले आहे.
राहुल हा झारखंडमधील गुमला जिल्ह्यातला आहे. राहुलचे वडील विजय सोरेंग हे सीआरपीएफच्या 82व्या बटालियनमध्ये हेड कॉन्स्टेबल होते.
About The Author
![Manisha Thorat- Pisal Picture](https://www.newsexpressmarathi.com/media/100/2023-08/manisha.jpg)
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List