प्रासंगिक – …तर खरी दुर्गापूजा होईल!

प्रासंगिक – …तर खरी दुर्गापूजा होईल!

>> मनमोहन रो. रोगे   

कोणतेही सार्वजनिक काम करताना त्याचा समाजाच्या उन्नतीसाठी, विकासासाठी कसा आणि किती उपयोग होईल/होतो आहे याचा विचार आधी करायला हवा. काही उद्दिष्ट, ध्येय असायला हवे. तसे नसेल तर समाज भरकटण्यास आणि एखाद्या उत्सवाला जत्रेचे रूप यायला वेळ लागणार नाही. लोकमान्य टिळकांनी एक उद्दिष्ट ठेवून सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. ते उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर काही वर्षांत उत्सव म्हणजे मनोरंजन असे सुरू झाले. उत्सवातून समाजास उचित दिशा देण्यास आपण कमी पडलो. उत्सवात इतका पैसा जमा होतो, लोक एकत्र येतात. त्याचा उपयोग देशात सध्या बोकाळलेला भ्रष्टाचार, स्वैराचार, अनाचार, बेशिस्त दूर करण्यासाठी केला जात नाही. उत्सव म्हणजे मिरवणे, मौजमजा करणे असा समज झाला आहे आणि म्हणूनच दक्षिणेकडे म्हैसूर, बाजूच्या गुजरात आणि पश्चिम बंगाल राज्यांमध्ये धुमधडाक्यात साजरा होणारा नवरात्रोत्सव अवघ्या काही वर्षांतच राज्यात शहरांपासून खेडय़ांपर्यंत पोहोचला. काही ठिकाणचे जुने उत्सव सोडल्यास सध्या नवरात्रोत्सव म्हणजे मुक्तपणे गरबा खेळण्यास वाव देणे हाच उद्देश दिसतो. या उत्सवाच्या निमित्ताने मुंबईत 45/50 वर्षांपूर्वी काही गुजराती व्यावसायिक एखाद्या मैदानात सशुल्क गरबा नृत्याचे आयोजन करीत असत, ज्यात श्रीमंत तरुण-तरुणीच भाग घेऊ शकत होते, पण त्यांचे पाहून हळूहळू आणखी काही लोकांनी तशा प्रकारे सशुल्क गरबा नृत्य सुरू केले आणि मग जवळपास साऱ्या नवरात्रोत्सव मंडळांमध्ये सायं. सात वाजल्यापासून सर्वांसाठी गरबा खेळाचे आयोजन सुरू झाले. येथे कोणतेही शुल्क भरायचे नाहीच, पण काही प्रसिद्ध मंडळे गरबा नृत्यांमध्ये भाग घेणाऱ्यांना रोज पारितोषिके देऊ लागली आणि बघता बघता दररोज प्रत्येक मंडळात केवळ गरबा खेळण्यासाठी हजारो माणसांची जत्रा जमू लागली. या उत्सव मंडळांवरही नेत्यांचा वरचष्मा राहिलेला आहे. त्यामुळे रात्री वेळेची व आवाजाच्या मर्यादेची बंधने झुगारली जाऊ लागली.

खरे तर आदिशक्ती आदिमायेच्या जागराचा हा उत्सव होय. उत्सव करणाऱ्या आणि गरबा खेळणाऱ्या बहुतेक व्यक्तींना नवदुर्गांतील चार दुर्गांची नावेही सांगता येणार नाहीत. कारण त्याबद्दल माहिती नसते. उत्सवाच्या नऊ दिवसांत पहिल्या दिवशी पूजेचा मान शैलपुत्री मातेचा मानतात. त्यानंतर अनुक्रमे माता ब्रह्मचारिणी, माता चंद्रघंटा, माता कुष्मांडा, स्कंदमाता, माता कात्यायनी, माता कालरात्री, माता महागौरी आणि माता सिद्धिदात्री अशा दुर्गांची पूजा करण्याची, आईचा जागर करण्याची प्रथा आहे. जो उत्सव आपण साजरा करतो त्याबद्दल पौराणिक माहिती लोकांना मिळेल अशी सोय मंडळांनी करायला नको का? तशी माहिती देण्याची त्यांची जबाबदारी होत नाही का? आज समाजात आपल्याच मुली, महिलांवर रोज अत्याचार होताहेत. कोणतेही वृत्तपत्र घ्या नाहीतर कोणतीही वृत्तवाहिनी पहा, त्यात दररोज महिला अत्याचारांच्या कितीतरी बातम्या दिसतात. अतिशय अमानुष पद्धतीने मुली, महिलांना ठार केले जात आहे. कितीतरी मुली, महिला रोज बेपत्ता होताहेत. समाज जणू असंवेदनशील झालेला आहे. मग अशा उत्सवांतून महिलांचे सबलीकरण करण्यासाठी आपण काही करतो का? याचा विचार उत्सव साजरा करणारे करणार आहेत की नाही? रात्र रात्र गरबा/दांडिया खेळून ते होणार आहे का? मुली, महिलांचे त्या त्या क्षेत्रातील योग्य व्यक्तींकडून समुपदेशन केल्यास, अडीअडचणी-कठीण प्रसंगात स्वसंरक्षण कसे करावे? याचे प्रशिक्षण दिल्यास महिला फसवल्या जाणार नाहीत, अत्याचार घडणार नाहीत. निदान त्यांचे प्रमाण नक्कीच कमी होईल, पण हे होणार कसे? उत्सवानिमित्ताने जी स्त्राr शक्ती एकत्र होते तिचा वापर त्यांना जागं करण्यासाठी केल्यास त्यांना त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात होईल. सामाजिक शांतता राखण्यात होईल. तो आपल्यातील दुर्गांचा खऱ्या अर्थाने जागर ठरेल, पण समजा असे उपक्रम काही मंडळांनी भविष्यात सुरू केले तर त्याचा लाभ किती मुली, महिला घेतील? असाही प्रश्न पडतो. कारण नवरात्रोत्सव म्हणजे गरबा, नवनवीन रंगाचे रोज कपडे, मौजमजा असे समीकरणच झालेले आहे. उत्सवात गरबा खेळू नये, मौजमजा करू नये असे कुणीही म्हणणार नाही, पण काळाची गरज ओळखून त्यात थोडे बदल करायला हरकत नाही. आपल्या घरातील, शेजारच्या, समाजात ज्या दुर्गा वावरतात त्यांची सुरक्षितता, त्यांचा सन्मान हे विषय या उत्सवाच्या माध्यमातून उजागर झाले पाहिजेत. म्हणजे खऱ्या अर्थाने दुर्गापूजा केली असे होईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मंत्री अब्दुल सत्तार बाजार समित्यांची परिषद सोडून पळाले; पणन मंडळात प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप, राज्यातील बाजार समित्या सोमवारी बंद मंत्री अब्दुल सत्तार बाजार समित्यांची परिषद सोडून पळाले; पणन मंडळात प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप, राज्यातील बाजार समित्या सोमवारी बंद
कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कोणत्याही बांधकामासाठी लागणाऱ्या (बारा-एक) परवानगीकरिता पणन मंडळाचे अधिकारी पैसे घेत असल्याचा मुद्दा मांडताच पणन मंत्री अब्दुल...
प्रासंगिक – …तर खरी दुर्गापूजा होईल!
इराण-इस्त्रायल युद्धामुळे विमानाचे तिकीट महागले
म्यानमार : भारताशेजारील घडामोडींचे नवे केंद्र?
मराठी आता अभिजात भाषा! शिवसेनेच्या लढय़ाला यश… ऐतिहासिक घटना
यंदा कडाक्याची थंडी पडणार
सागरी परिक्रमासाठी नौदलाच्या दोन ‘दुर्गा’ तारिणीवर स्वार