अमेरिका बॅलेट पेपरवरच निवडणुका घेण्यावर ठाम; मोदींसमोरच ट्रम्प यांनी अधोरेखित केलं महत्त्व
2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मदत निधीचे वितरण करणारी संस्था USAID (United States Agency for International Development) च्या सहभागाचे आरोप भाजपकडून करण्यात आले होते. त्यानंतर अमेरिकेत ट्रम्प प्रशासन आल्यानंतर USAID वर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचाच संदर्भ घेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना 2020 च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील USAID च्या सहभागाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ट्रम्प यांनी हिंदुस्थानसंदर्भात कोणतेही उत्तर दिले नाही. त्याचवेळी पारदर्शक निवडणुकांसाठी प्रयत्न सुरू असून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा मुद्दा अधोरेखित केला.
हिंदुस्थानी पत्रकारांनी डोनाल्ड ट्रम्प यांना प्रश्न विचारला की, ‘मदत निधीचे वितरण करणारी संस्था USAID (United States Agency for International Development) चा 2020 च्या अमेरिकेतली निवडणुकीत किंवा 2024 च्या हिंदुस्थानात झालेल्या निवडणुकीत काही हात होता का? तर या प्रश्नावर उत्तर देताना ट्रम्प यांनी हिंदुस्थानच्या संदर्भातील मुद्द्यावर काही विधान केलं नाही, हिंदुस्थानच्या निवडणुकीवर काही देखील बोलले नाही. मात्र अमेरिकेचा संदर्भ देत म्हणाले की, ‘त्यांचा (USAID) चा हात असण्याची शक्यता आहे. 2020 मध्ये अनेक चुकीच्या गोष्टी घडल्या. 2024 मध्ये देखील तसे प्रयत्न झाले. मात्र ही प्रचंड मोठी निवडणूक होती. रिपब्लिकन पक्षाने मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे’, असं ट्रम्प यांनी सांगितलं.
अमेरिकेतील निवडणुकांसंदर्भात पुढे बोलताना ट्रम्प म्हणाले की, ‘आम्ही अशा प्रणालीकडे जाण्याचा विचार करत आहोत जिथे एकाच दिवशी मतदान होईल, मतदार ओळखपत्र असेल आणि बॅलेट पेपर (मतपत्रिका) असतील…’ पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोरच ट्रम्प यांनी बॅलेट पेपरवरच निवडणुका घेण्याचा स्पष्ट उल्लेख केला. यामुळे अमेरिकेसारखा तंत्रज्ञानाचा स्पर्धेत पुढे असलेला देश आजही पारदर्शी निवडणुकांसाठी बॅलेट पेपरच वापरण्यावर जोर देत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, ट्रम्प प्रशासनाने USAID विरुद्ध ठोस कारवाई करत त्यांना जागतिक स्तरावर सुरू असलेले काम थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र अत्यावश्यक सेवेत येणारी अन्न पुरवठ्याची मदत या बंदीतून वगळण्यात आली आहे.
About The Author
![Manisha Thorat- Pisal Picture](https://www.newsexpressmarathi.com/media/100/2023-08/manisha.jpg)
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List