आर्मीत भरतीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्याला बेड्या, मिलिटरी इंटेलिजन्स आणि पुणे पोलिसांची कारवाई
शासकीय परीक्षांसाठी पुण्यात आलेल्या तरुणांना हेरून त्यांना आर्मीत भरती करतो, असे सांगून लाखो रुपये उकळणाऱ्या एकाला मिलिटरी इंटेलिजंट आणि बंडगार्डन पोलिसांनी अटक केले. मोहित रामसिंग धामी (वय 32, रा. उत्तराखंड) असे त्याचे नाव आहे.
मोहित हा कमांड हॉस्पिटलमधील कँटीनमध्ये कंत्राटी कामगार म्हणून कामाला होता. त्यामुळे त्याला आर्मी भरतीची माहिती होती. त्याचा गैरफायदा घेऊन तो बाहेरगावाहून परीक्षांसाठी आलेल्या तरुणांना खोटे बोलून फसवत होता. धुळ्यातील 23 वर्षांच्या तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 31 मार्च 2024 ते 12 फेब्रुवारीपर्यंत सुरू होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षेसाठी पुण्यात आले होते. 31 मार्च 2024 रोजी ते परीक्षा देऊन परत धुळ्याला जाण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशन येथे गेले. रात्री आठच्या सुमारास त्यांना मोहित धामी हा भेटला. त्याने तो आर्मीमध्ये असून, सध्या कमांड हॉस्पिटल येथे ड्युटीला असल्याचे सांगितले. त्याच्याशी गप्पा मारत असताना त्याने आर्मीमध्ये जॉईन करून देतो, असे त्यांना सांगितले. तेव्हा त्यांनी आमचे वय जास्त झाले आहे, असे सांगितले. तुमचे वय जास्त असले तरी तुमचे काम करून देतो, असे सांगून एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. 3 एप्रिल 2024 रोजी त्याने फोन करून कागदपत्रे मागवून घेतली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी तक्रार दाखल केली.
आर्मी इंटेलिजन्सचे अधिकारी मोहित धामी याचा शोध घेत असताना, मंगळवारी (दि. 11) तो पुन्हा पुणे रेल्वे स्टेशन येथे आढळून आला. आर्मी इंटेलिजन्सच्या पथकाने त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याला बंडगार्डन पोलिसांच्या हवाली केले. बंडगार्डन पोलिसांनी त्याला अटक केली असून, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते तपास करत आहेत.
About The Author
![Manisha Thorat- Pisal Picture](https://www.newsexpressmarathi.com/media/100/2023-08/manisha.jpg)
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List