पुण्यातील डॉ. डुंबरे-पाटील कुटुंब ठरले ‘आयर्नमॅन’, इटलीतील विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद
पुणे शहरातील डॉ. डुंबरे-पाटील कुटुंबाने इटलीत नुकत्याच झालेल्या 70.3 आयर्न मॅन ट्रायथलॉन स्पर्धेमध्ये बाजी मारत पुण्याचा झेंडा जगाच्या नकाशावर रोवला आहे. हडपसरमध्ये राहणारे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. संपत शिवाजीराव डुंबरे-पाटील, त्यांच्या पत्नी रेडिओलॉजिस्ट डॉ. वैशाली डुंबरे-पाटील, कन्या प्राची व मुलगा प्रसाद यांनी ही स्पर्धा निर्धारित वेळेत पूर्ण करत विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. हा विक्रम झाल्याचे मानपत्र नुकतेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या वतीने डॉ. चित्रा जैन यांनी डुंबरे-पाटील कुटुंबाला प्रदान केले.
‘आयर्न मॅन ट्रायथलॉन’ ही स्पर्धा इटलीतील रोमालिया येथे 22 सप्टेंबर 2024 रोजी झाली. या स्पर्धेत डॉ. संपत, डॉ. वैशाली आणि बीजे वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे अंतिम वर्षात शिकणारी प्राची व प्रथम वर्षात शिकणारा प्रसाद यांनी सहभाग घेतला. एड्रियाटिक समुद्रामध्ये 1.9 किमी पोहणे, त्यानंतर लगेच 90 किमी सायकल चालविणे आणि 21 किमी धावणे असे या स्पर्धेचे स्वरूप होते. ही संपूर्ण स्पर्धा आठ तासांत पूर्ण करण्याचे आव्हान स्पर्धकांसमोर होते.
विविध देशांतील 3500 पेक्षा जास्त स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. पोहण्याच्या वेळी समुद्रातील लाटांचा व सायकलिंगच्या वेळी प्रचंड वारा व चढ-उतारांचा सामना स्पर्धकांना करावा लागला. परंतु, डुंबरे पाटील कुटुंबातील चारही सदस्यांनी शारीरिक व मानसिक आव्हानांवर मात करत उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेसाठी चौघेही गेल्या 8 ते 10 महिन्यांपासून प्रचंड मेहनत घेत होते. प्राची व प्रसाद दोघांनीही आपला अभ्यास सांभाळून स्पर्धेसाठी सरावाला वेळ दिला.
डॉ. चित्रा जैन यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने डुंबरे-पाटील कुटुंबाच्या विक्रमाची नोंद घेतली असून, या ऐतिहासिक कामगिरीबद्दल अभिनंदन करत असल्याचे नमूद केले. या स्पर्धेच्या तयारीसाठी मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक चैतन्य वेल्हाळ, स्ट्रेंथ ट्रेनर पीयूष कुमार, स्विमिंग प्रशिक्षक शुभंकर झरे, योगप्रशिक्षक आराध्या व अविनाश यांना डुंबरे-पाटील कुटुंबाकडून यावेळी सन्मानित करण्यात आले.
” ही स्पर्धा आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे. एकाच कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकाच स्पर्धेत अशी कामगिरी करणे हे केवळ हिंदुस्थानातीलच नव्हे, तर जगातील एकमेव उदाहरण आहे. अभ्यासाबरोबरच आपल्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी मुलांनी सजग राहावे, हा या मागचा हेतू होता. व्यायाम व शरीर स्वास्थ्यासाठी एकत्र आल्यामुळे आमच्यातील फॅमिली बॉण्डिंग खूप छान झाले आहे.
– डॉ. संपत डुंबरे-पाटील
● स्पर्धेच्या शेवटच्या काही दिवसांत अनेक अडथळे आले. प्राचीच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने तिला तीन महिने वॉकर वापरावा लागत होता. स्पर्धेच्या पंधरा दिवस आधी तिने मेहनत घेत ताकद मिळवली. प्रसादचीही बारावी व ‘नीट’ परीक्षेची तयारी सुरू होती. मुलांना योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले, तर मुले निश्चितच त्याती यशस्वी होतात. नियमित व्यायामाचा दोन्ही मुलांना त्यांच्या अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी खूप उपयोग झाला. त्यांची शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती वाढली. या स्पर्धेच्या तयारीसाठी एकत्रित केलेला हा प्रवास आमच्यासाठी अतिशय आनंददायी व अविस्मरणीय आहे. ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने त्याची नोंद घेतली, याचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे.
डॉ. वैशाली डुंबरे-पाटील
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List