बेगडी हिंदुत्व, परभणी हिंसाचार, अपहरण, हत्या, बनावट औषधांच्या मुद्द्यावरून सरकारला घेरणार; नागपूरच्या थंडीत सत्ताधाऱ्यांना घाम फुटणार
महाविकास आघाडीकडे कमी संख्याबळ असतानाही नागपूरच्या थंडीत सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना चांगलाच घाम फुटणार आहे. दादर येथील हनुमान मंदिर पाडण्यासाठी रेल्वेने दिलेल्या नोटिसीमुळे भाजपचे बेगडी हिंदुत्व उघडकीस आले आहे. महायुतीच्या राज्यात परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची झालेली विटंबना, बीड जिह्यात सरपंचाची झालेली हत्या, कुर्ला येथील बस अपघातात निरपराध नागरिकांचे गेलेले बळी, धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबईतील मोक्याचे भूखंड अदानीच्या घशात घालण्याचा सुरू असलेला प्रयत्न, बनावट औषधांच्या रॅकेटचे गुजरातपर्यंत पोहचलेले धागेदोरे, ईव्हीएम घोटाळा करून मतांवर टाकलेला दरोडा, शेतकरी आत्महत्या आदी मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरणार आहेत.
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सत्ता स्थापन करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचे पहिले अधिवेशन नागपूरमध्ये सोमवार, 16 डिसेंबरपासून सुरू होत आहे. सत्ताधारी बाकावर सदस्यांची संख्या जास्त दिसत असली तरी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेस यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीकडे कमी संख्याबळ असतानाही सत्ताधाऱ्यांना जेरीस आणण्याची संधी गेल्या पंधरा दिवसांत राज्यात घडलेल्या विविध घटनांवरून चालून आली आहे. सहा दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात लक्षवेधी, प्रश्नोत्तरे होणार नसली तरी महाराष्ट्रातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, महिला अत्याचाराचे वाढते प्रकार याचबरोबर हिंदुत्व, संविधान संरक्षण आदी मुद्दे सरकारसाठी अडचणीचे ठरणार आहेत.
संविधान संरक्षणाचा मुद्दा
परभणीत जातीयवादी समाजकंटकाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापुढील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केली. यामुळे संविधान संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. परभणीतील घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले असून ठिकठिकाणी निषेध आंदोलने सुरू आहेत. यामुळे आंबेडकरी अनुयायांच्या विरोधात पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. संविधान रक्षणाच्या मुद्द्यावरून पुढे आलेल्या जनसमुदायाला पोलिसांकडून विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचा जाब विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना विचारला जाईल.
फक्त पुरवणी मागण्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन होताच लगेच राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे या अधिवेशनात तारांकित प्रश्नोत्तरे आणि लक्षवेधी सूचना होणार नाहीत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 2024-25 या वर्षाच्या पुरवणी मागण्या सादर होतील. या मागण्यांवर दोन दिवस चर्चा होईल. याशिवाय राज्यपालांच्या अभिभाषणावर दोन्ही सभागृहांत दोन दिवस चर्चा होणार आहे. तसेच नियम 293 अन्वये प्रस्ताव आणि अंतिम आठवडा प्रस्ताव यावर विधानसभेत चर्चा होऊन त्याला सरकारकडून उत्तरे दिली जातील.
सत्तापक्षाच्या ग्रामपंचायतीत ईव्हीएमच्या बाजूने ठराव
मारकरवाडीत ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन पुकारत ग्रामस्थांनी मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी लावून धरली आहे. त्यास प्रशासनाकडून विरोध केला जातो. दुसरीकडे सत्ताधारी पक्षाच्या ताब्यातील ग्रामपंचायतीत ईव्हीएमच्या बाजूने ठराव घेतले जात आहेत. यास प्रशासनाकडून पाठिंबा दिला जात आहे. याचा जाब विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधकांकडून विचारला जाणार हे निश्चित आहे.
ईव्हीएम हटाव मोहिमेचे पडसाद
लोकसभेत सपाटून मार खाणाऱ्या महायुतीला विधानसभा निवडणुकीत भरभरून मते मिळाल्याने ईव्हीएममध्ये गडबड घोटाळा करून भाजपने निवडणुका जिंकल्याचा संशय आहे. निवडणूक आयोगाने मतदानाच्या सादर केलेल्या आकडेवारीमुळे हा संशय अधिकच बळावला आहे. सहा वाजता मतदान संपल्यावर रात्री 10 वाजेपर्यंत 75,97,067 मतांची वाढ कशी झाली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच मारकडवाडीत ईव्हीएम विरोधात सुरू झालेले आंदोलन दडपण्यासाठी झालेल्या प्रयत्नांचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
मराठा, धनगर आरक्षणाचा प्रश्न
लोकसभा आणि विधासभा निवडणुकीत मराठा आरक्षणासह धनगर आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. विधिमंडळाच्या अधिवेशनात मराठा आणि धनगर आरक्षणाबाबतची भूमिका सरकारला स्पष्ट करावी लागणार आहे.
बनावट औषधांचा पुरवठा
राज्यात बनावट औषधे आणि गोळ्या तयार करणाऱ्या कंपन्यांनी रुग्णांच्या जिवाशी खेळ चालवलेला आहे. अंबाजोगाई स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय आणि ग्रामीण रुग्णालयात ऑझिथ्रोमायसीनच्या बनावट गोळ्यांचा पुरवठा झाल्याचे उघड झाले आहे. कोल्हापूर, नागपूर, ठाण्यामध्ये बनावट गोळ्यांचा पुरवठा होत आहे. बनावट गोळ्यांच्या मुद्द्यावरून महायुती सरकार ‘बॅकफूट’वर जाण्याची शक्यता आहे
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List