सत्याचा शोध – असेही एक शांतिनिकेतन

सत्याचा शोध – असेही एक शांतिनिकेतन

>>चंद्रसेन टिळेकर

पार्ल्याच्या सावरकर उद्यानातील अत्रे कट्टय़ाच्या उपक्रमात मुलांचा सहभाग असावा असे वाटत असताना पार्ल्याच्या एका शाळेतील मुलांसाठी वेगवेगळय़ा कार्यशाळा, शिबिरे व उपक्रम हाती घेतले गेले. असे हे पारावर भरणारे मुलांसाठीचे उपक्रम पाहता कट्टय़ाला ‘पार्ल्यातले शांतिनिकेतन’ असे संबोधले जाऊ लागले.

शनिवार म्हणजे ‘न कर्त्याचा वार’ अशी म्हण आहे. पण पार्लेकरांच्या दृष्टीने मात्र शनिवार म्हणजे कट्टय़ाचा वार असेच झाले होते. ज्या सावरकर उद्यानात हा कट्टा भरू लागला ते उद्यान जसे विविध फुलांनी बहरलेले होते तसे हे अत्रे कट्टा नामक ‘मुक्त व्यासपीठ’ विविध विषयांनी फुललेले असायचे. किशोरवयीन गटातील केवळ तीन-चार मुलेच कट्टय़ावर नित्यनियमाने येत. कधी कविता वाचून दाखवीत तर कधी आणखी काही. असे मुक्त व्यासपीठ म्हणजे मुलांसाठी उत्तम वक्ता होण्यासाठीची कार्यशाळाच होती. तेव्हा काहीही करून मुलांनी कट्टय़ावर यावे म्हणून प्रयत्न करणे भागच होते. शेवटी पार्ल्यातल्या जमतील तेवढय़ा शाळांत जाऊन मुलांना कट्टय़ावर येण्यासाठी प्रोत्साहित करायचे असे ठरवले. अशाच एका शाळेत मी अत्रे कट्टय़ाची माहिती देण्याकरिता गेलो होतो. त्या शाळेतील बहुतांशी विद्यार्थी सामाजिक तसेच आर्थिकदृष्टय़ा मागासलेल्या स्तरातील होते. माहिती सांगून झाल्यावर मी विद्यार्थ्यांना म्हणालो, “मुलांनो कट्टय़ावर लेखक, कवी येतात. अगदी तुमच्या पाठय़पुस्तकात ज्यांचे धडे आहेत ना ते तुम्हाला जवळून पाहता येतील. मला सांगा तुम्हाला कोणाला बघायला आवडेल? मी त्यांना तुमच्यासाठी कट्टय़ावर बोलवीन.’’

ही गोष्ट 2000 सालातली! मुलांना वाटले, सर नाव विचारताहेत तर सांगायला हवे. नावे सांगता यावीत म्हणून मराठीच्या पुस्तकाची पाने चाळत ही मुले कुसुमाग्रजांना बोलवा, आचार्य अत्रेंना बोलवा असे म्हणू लागली. मी पुरता गोंधळून गेलो. बाजूलाच वर्गशिक्षक उभे होते. मी त्यांना विचारले, “ही मुले माझी चेष्टा तर करीत नाहीत ना? कुसुमाग्रजांना, अत्रेंना बोलवा म्हणताहेत.’’ मास्तरांची कशात तंद्री लागली होती कुणास ठाऊक. ते मुलांची बाजू घेत म्हणाले, “नाही हो, तुम्ही खुशाल त्यांना बोलवा, आज्ञाधारक मुले आहेत आमची. ऐकतील त्यांची भाषणे.’’

प्रत्यक्ष आधुनिक द्रोणाचार्यांचे हे उद्गार ऐकून मला धरती दुभंगून पोटात घेईल तर बरे होईल असे वाटले. मी तडक मुख्याध्यापकांना भेटलो. सारा प्रकार कानावर घातला. ते शांतपणे म्हणाले, “अहो, आमची शाळा गरीब वस्तीतली आहे. कोणाच्याही घरात साधे वर्तमानपत्र येत नाही. महिन्याकाठी एखादे पुस्तकही खरेदी करीत नाही. पालक दिनाला हजरही राहत नाहीत. मग मुलांची प्रगती व्हावी तरी कशी?’’

मुख्याध्यापकांनी तर अडचणींचा पाढाच माझ्यापुढे वाचून दाखवला. तरीही मी निर्धाराने त्यांना म्हणालो, “साहित्य, कला व इतर क्षेत्रांतील उपक्रमांसाठी आश्रयदाते असणारी मुले जर अशी सर्वदृष्टय़ा अनभिज्ञ राहिली तर कसे व्हायचे?याबाबत मी काही प्रयत्न केले तर आपण मला मदत करू शकाल?’’
“काय मदत हवी आहे आपल्याला?’’
“सर आता मुलांना उन्हाळय़ाची सुट्टी लागेल. मी मुलांसाठी कट्टय़ावर शिबीर घेऊ शकेन. अगदी विनाशुल्क! अभ्यासाचे विषय तर घेऊ शकेनच, पण व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा, पर्यावरण या विषयांबद्दलही त्यांना प्रशिक्षित करता येईल. दुसरे असे की, ही मुले ज्या आर्थिक स्तरातून येतात ते पाहता त्यांना कॉलेजात जाणे परवडेल की नाही याबद्दल शंकाच आहे. तेव्हा त्यांना स्वयंरोजगाराबद्दल माहिती देणे मोलाचे ठरेल. सुदैवाने तशी मंडळीही माझ्या ओळखीची आहेत.’’ मुख्याध्यापक म्हणाले, “अहो ही तर उत्तम कल्पना आहे. मी लगेच तसे सर्क्युलर काढतो. निदान शंभर-दीडशे तरी मुलांना तयार करण्याची जबाबदारी माझी.’’

मुख्याध्यापकांच्या या आश्वासनामुळे मला हुरूप आला. विविध विषय शिकविणारे पार्ल्यातील शिक्षक माझ्या ओळखीचे होते. ते सर्व आनंदाने तयार झाले. प्रसिद्ध गायक जयवंत कुलकर्णी यांनी ‘सुरांची आराधना’ या विषयावर बोलण्याचे कबूल केले, तर ‘वयात येताना’ या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करायला प्रसिद्ध कामतज्ञ डॉ. विठ्ठल प्रभू पुढे सरसावले. या विषयावर मराठी विज्ञान परिषदेने प्रकाशित केलेली पुस्तके अत्यंत कमी किमतीत उपलब्ध करून दिली. ज्या मुलांना पुढील महाविद्यालयीन शिक्षण शक्य नाही त्यांना स्वयंरोजगाराची ओळख व्हावी म्हणून आम्ही चक्क प्लंबर, इलेक्ट्रिशियन यांनाही कट्टय़ावर बोलावून त्यांच्या व्यवसायाची माहिती द्यायला लावली, तर मुलींसाठी ब्युटीपार्लरमध्ये काम करता यावे म्हणून पार्लरमधील महिलाही माहिती देण्यासाठी कट्टय़ावर आल्या. हे सगळे खरे, परंतु शिवसेनेचे नेते मा. प्रमोद नवलकर यांनीही कट्टय़ावर यावे असा माझा निग्रह होता. कारण नववीच्या मराठीच्या पुस्तकात ‘घंटा’ नावाचा त्यांचा धडा होता व त्यानिमित्ताने मुलांना प्रत्यक्ष त्या धडय़ाचे लेखक पाहायला मिळणार होते. मी त्यांच्याशी बोललो. मी त्यांना त्यांच्या धडय़ाविषयी व मुलांना दिलेल्या वचनाविषयी सांगितले. मी एकेकाळी भायखळा शिवसेना शाखेचा शाखाप्रमुख होतो. तेव्हा त्यांनी नंतर फारसे आढेवेढे घेतले नाहीत आणि मुलांसमोर येऊन उत्तम भाषण केले. जाताना ते दिलखुलासपणे म्हणाले की, “आजपर्यंत मी शेकडो भाषणे केली, पण असे निसर्गाच्या सान्निध्यात अन् वृक्षवल्लीच्या सहवासातले उमलत्या पिढीपुढे केलेले हे माझे पहिलेच भाषण आहे.’’

पारावर भरणाऱया या शिबिराबद्दल काही वृत्तपत्रांनी ‘पार्ल्यातले शांतिनिकेतन’ असा गौरव केला. या शिबिराबद्दलही अजून खूप काही सांगण्यासारखे आहे, पण ते पुढच्या वेळी.

[email protected]

(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडित आहेत.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबई लुटणाऱयांना जेलमध्ये पाठवू! आदित्य ठाकरे यांचा भाजप आणि मिंध्यांना इशारा मुंबई लुटणाऱयांना जेलमध्ये पाठवू! आदित्य ठाकरे यांचा भाजप आणि मिंध्यांना इशारा
मुंबईला जपणे, जोपासण्याचे काम शिवसेनेने केले आहे. बेस्ट, विजेचे माफक दर, 500 फुटांपर्यंतची घरे करमुक्त केली, मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकासाला...
विज्ञान-रंजन – हॅट्स ऑफ, व्हॉएजर!
राज ठाकरे परप्रांतीयांच्या लोंढय़ांवर बोलताच मिंध्यांना टेन्शन
मोदींची वाराणसीतील एकाही गावाला ना भेट, ना विचारपूस
रायबरेलीत अमित शहा यांच्या सभेत पत्रकाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण; सभेसाठी पैसे दिले होते का? विचारताच हल्ला
लोकशाहीवर विश्वास नसणारे भाजप सरकार हद्दपार करा; शरद पवार यांची कल्याणमध्ये विराट सभा
दिल्ली डायरी – धडधड, धाकधूक आणि घबराट…!