कला परंपरा- सावंतवाडीची लाकडी खेळणी

कला परंपरा- सावंतवाडीची लाकडी खेळणी

>> डॉ. मनोहर देसाई

सावंतवाडीतील लाकडी खेळणी जगप्रसिद्ध आहेत. ही कला कोकणात रुजण्याचे श्रेय जाते सावंतवाडीचे राजे खेमराज सावंत-भोसले यांना. चारशे वर्षांपूर्वी राजवाडय़ातील सुशोभीकरणाच्या कामासाठी गोवा, कर्नाटक व राजस्थान या ठिकाणाहून बोलावण्यात आलेल्या कलाकरांना कायमचा राजाश्रय मिळाला आणि कला विषयात रुची असणारे, चित्र रंगवणारे हे कलाकार ‘चितारी‘ म्हणून संबोधले जाऊ लागले. परंपरा आणि संस्कृती जपत ही कला आजही स्वतंत्र ओळख टिकवून आहे.

सावंतवाडीच्या बाजारपेठेत रंगीबेरंगी खेळण्यांच्या दुकानांमधून फेरफटका मारायला निघालो. निसर्गरम्य ठिकाण. सावंतवाडीच्या मधोमध असणारे सुंदर तळे आणि त्याच्या बाजूला वसलेली बाजारपेठ आणि घरे. या तळ्याभोवती फेरफटका मारताना या गावाचे नाव पूर्वी ‘सुंदरवाडी’ का होते, याचा अनुभव येथील निसर्गसौंदर्य पाहून येतो. तळ्यापुढे चक्कर मारता मारता बाजारपेठेत प्रवेश केला आणि तेथून ‘चितारी गल्लीतील’ एका खेळण्याच्या दुकानात गेलो. त्याच वेळी खेळण्यांच्या दुकानांमध्ये एका प्रौढ दांपत्याने प्रवेश केला. दुकान मालक व त्या दांपत्याचा संवाद सुरू झाला.

कोकणातली माणसे अतिशय आपुलकीने आणि प्रेमाने बोलतात. “काय कसं काय?’’  हा प्रश्न त्यांनी अगदी दोन शब्दांत मालवणी भाषेत विचारला, “बरा मा?’’ उत्तर मिळाले…“बरा हा’’. बाजारातून आणलेल्या इतर सामानाच्या पिशव्या निर्धास्तपणे तेथे टेकवत या दांपत्यातील काकांनी रुमालाने चेहऱयावर हवा मारत सुस्कारे सोडायला सुरुवात केली. दुकान मालकाने त्यांना बसण्यासाठी लाकडी स्टूल पुढे ढकलला आणि मंडळी निवांत झाली. घरी पाहुणे आल्यासारखे दुकानातील कामगाराने त्यांच्यापुढे तांब्या फुलपात्र आणून ठेवले. कामगाराचीसुद्धा चौकशी, “तुझा कसा चलला हा? बरा मा?’’ “होय तर…’’ काकांनी पाणी घेतलं आणि मग चर्चेला सुरुवात झाली. “आमच्या धाकल्या चेडवाचा लग्न ठरला?’’, “खय दिली? पुण्याक का मुंबईक? लगीन खय असा? तिच्या घोवाचो कामधंदो काय?’’ त्यांच्या गप्पा त्या रंगीत खेळण्यांच्या दुकानात भलत्याच रंगत चालल्या होत्या आणि याच चर्चेमध्ये खरेदीला सुरुवात झाली.

कोकणामध्ये मुलींना लग्नानंतर सासरी जाताना लाकडी वस्तू, फळे, भाज्या देण्याची परंपरा आहे. हे काकासुद्धा त्याच कारणामुळे येथे खरेदीला आले आहेत याची मला जाणीव झाली. पोपटाची चित्रं असणारे किराचे पाट (गोव्यात पोपटाला कीर म्हणतात), देवघर,  खोबरे किसायची विळी, रुखवतामध्ये ठेवायला लाकडी खेळण्यातली भांडीकुंडी, सासरी जाणाऱया मुलीला धान्याने भरलेली लाकडी खेळण्यातली बैलगाडी, लाकडी फळे व भाज्या, पोळपाट-लाटणे, पूजेचा चौरंग, शिरवाळे (तांदळाच्या उकडलेल्या पिठाच्या शेवया) काढायचा शेवगा, लाकडी चौकट असणारा मेकअपचा आरसा व त्याचे साहित्य ठेवायची पेटी अशा एकामागोमाग एक वस्तूंची यादी तयार झाली. मग त्यातील सुबकता तपासत एकेक वस्तू त्त्यांनी निवडून बाजूला ठेवल्या. हिशेबाचे पैसे देताना दुकानदाराने काकांच्या खांद्यावर अलगद हात ठेवला. खेळण्यांच्या दुकानातील त्या बाजारपेठेत मला लग्न मंडपातील सनईचे सूर ऐकू येऊ लागले. या दांपत्याने येथून केलेली खरेदी आणि मुलीच्या संसारात या खेळण्यांच्या रंगांप्रमाणेच रंग बहारावे ही त्यांची भावना पाहून सावंतवाडीच्या या खेळण्यांवर लिहिण्याचा मोह झाला नस्ता तर नवलच.

सावंतवाडीतील गांधी चौकातील काणेकर, त्याचप्रमाणे चितारी गल्लीतील अनेक चितारी कुटुंबाच्या खेळण्यांच्या दुकानातून फेरफटका मारत तेथील जाणत्या कलाकारांबरोबर चर्चा करत या विषयाची माहिती घ्यायला सुरुवात झाली. या कलेला प्रोत्साहन देणाऱया सावंतवाडीच्या सावंत भोसले यांच्या राजवाडय़ामध्ये अलगद पावले वळली आणि या विषयाच्या लिखाणाला योग्य दिशा मिळाली.

सावंतवाडीच्या परिसरात हे खेळण्याचे व्यवसाय नेमके कसे सुरू झाले याच्या इतिहासाला याच वाडय़ातून सुमारे चारशे वर्षांपूर्वी सुरुवात होते. सावंतवाडीचे राजे खेमराज सावंत-भोसले यांना कला विषयात रुची होती. त्यांच्या राजवाडय़ातील लाकडी फर्निचर तसेच इतर सुशोभीकरणाच्या कामासाठी गोव्यातून काही लाकडात काम करणाऱया कलाकारांना त्यांनी निमंत्रित केले. तसेच कर्नाटक व राजस्थान या ठिकाणाहूनसुद्धा काही कलाकार येथे आल्याचे येथील कलाकारांनी सांगितले. राजवाडय़ातील सजावटीचे काम पूर्ण झाल्यानंतर महाराजांनी त्यांना सावंतवाडी येथेच या व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून दिली. सावंतवाडीच्या राजघराण्यासाठी याच कलाकारांनी गंजिफा तयार केल्या. गंजिफा ठेवण्यासाठी तसेच इतरही वस्तू ठेवण्यासाठी छोटय़ा छोटय़ा रंगीत लाकडी पेटय़ा अतिशय सुबक रंगसंगती व चित्रांनी सजवत तयार केल्या.  चित्र रंगवणारे कलाकार म्हणून दरबारामध्ये त्यांना ‘चितारी‘ असे संबोधले जात असे. पुढे हेच बिरूद त्यांची ओळख झाली व कोकणातील सर्व लोक त्यांना ‘चितारी’ म्हणून संबोधू लागले. सावंतवाडीमध्ये या कलाकारांसाठी त्यांची दुकाने व कार्यशाळा ज्या गल्लीमध्ये आहेत, त्या गल्लीलासुद्धा ‘चितारी गल्ली’ असेच नाव मिळाले. सावंतवाडीपासून जवळच या कलाकारांना त्यांचे छोटे छोटे कारखाने टाकण्यासाठी त्या काळी महाराजांकडून जागासुद्धा उपलब्ध करून देण्यात आली. आजही या कारखान्यांमधून कारागीर अनेक कलाकृती घडवत आहेत.

या कलाकारांच्या दुकानांमधून विवाहप्रसंगी मुलींना माहेरून भेट देण्याच्या वस्तू मांडल्या गेल्या. त्याचबरोबर लहान मुलांना खेळण्यासाठी अतिशय आकर्षक अशी लाकडी खेळणीसुद्धा या कलाकारांनी तयार केली. सध्याच्या चायनीज खेळण्यांना बऱयाच देशांमध्ये बंदी आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे या खेळण्यांसाठी वापरण्यात आलेले रासायनिक रंग व साहित्य हे लहान मुलांच्या आरोग्यासाठी घातक आहेत हे अनेक देशांनी निदर्शनास आणले. अशा वेळी आमची लाकडी खेळणी मुले मन लावून खेळतात तसेच त्याचे रंग व साहित्य यातून मुलांना कोणतीही हानी पोहोचत नाही ही माहिती येथील दुकानदार ग्राहकांना आवर्जून देतात. कोकणामध्ये विविध सणांच्या निमित्ताने जत्रांसाठी विविध देवदेवतांचे मुखवटे, चेहरे तयार करण्यासाठी  किंवा जुन्या मुखवटय़ांना जत्रेच्या आधी रंगकामासाठी याच ‘चितारी’ कलाकारांना निमंत्रित केले जाते.

अशा प्रकारच्या विविध कामांमुळे या कलाकारांच्या उपजीविकेला मोठा हातभार लागला व ही कुटुंबे त्यामुळेच येथे आनंदाने स्थिरावली. इंग्रज राजवटीमध्येसुद्धा येथील कलाकारांना काही फर्निचर, टेबल लॅम्प, पंखे, विविध शस्त्रांचे पॉलिश तसेच त्यांची आवरणे तयार करण्याचे काम मिळाले.

z [email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे निधन ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे निधन
मराठी मालिकाविश्वातून लोकप्रिय झालेले ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन झालं आहे. रंगभूमीवरच त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. सृजन द...
भाजपाचे अब की बार 400 पार सोडा, देशभरातून 40 जागाही येणार नाहीत – मल्लिकार्जुन खरगे
मजुर नेणारे वाहन उलटले; 27 मजुर जखमी
यापुढे निवडणूक लढवणार नाही; एकनाथ खडसेंची घोषणा, राजकारणातून निवृत्तीचे दिले संकेत
दिल्ली विमानतळ आणि दोन रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी
मॅड कॉमेडी आणि धावपळीची धमाल…; ‘ये रे ये रे पैसा’ पुन्हा बॉक्स ऑफिसवर
तेलुगु आणि कन्नड अभिनेत्रीचे अपघाती निधन