मनतरंग – आम्ही आहोत!

मनतरंग – आम्ही आहोत!

>>दिव्या नेरुरकर-सौदागर

मानसिक अस्वास्थ्य आणि त्यावर उपचार घेत असलेल्या व्यक्तींना स्वतच्या हक्काच्या माणसांकडून जर आधार मिळाला नाही तर अशा व्यक्ती अधिक ढासळतात. म्हणूनच मानसिक स्वास्थ्यावर उपचार घेणाऱया व्यक्तीबरोबरच तिच्या घरच्या सदस्यांचेही समुपदेशन होणे अत्यंत आवश्यक झाले आहे. कारण मनाशी संबंधित समस्यांवर उपचार पद्धतींसोबतच घरातून मिळणारा ‘आम्ही आहोत’ हा दिलासा रुग्णाला लवकर बरा करू शकतो.

“माम, मी आता काऊन्सलिंग करून घेणार नाही. आज मी शेवटची येतेय.’’ असं म्हणतच अक्षयाने (नाव बदलले आहे) मान खाली घातली आणि टेबलवर ठेवलेल्या पेपरवेटशी चाळा करायला लागली. दोन मिनिटे तिची अस्वस्थतेतच होती. थोडा वेळ शांततेत गेला. नंतर तिने स्वतच बोलायला सुरुवात केली. अक्षया तिच्या पालकांवर भयंकर नाराज होती आणि या तिच्या नाजूक परिस्थितीत ‘ते समजून घेत नाहीत’ म्हणून अजूनच दुखावली गेली होती.

अक्षया गेली तीन वर्षे तिच्या नैराश्याकरिता समुपदेशन घेत होती. ती कमी काळात बरीचशी सावरलीही असती. मात्र तिचे समुपदेशन आणि मानसोपचार यामध्ये सातत्य नव्हते. ती सत्रांसाठी यायची. त्यावर औषधोपचारही सुरू करायची. हे काही दिवस सुरू राहिले की, अचानक दोन-तीन महिने सत्रांसाठी यायचीच नाही. त्यानंतर समस्या वाढली की, मग घाईने फोन करून अपॉइंटमेंट घ्यायची आणि पुन्हा मानसोपचारांना सुरुवात करायची. काही दिवसांनी पुन्हा तेच. सातत्याच्या अभावामुळेच तिच्या उपचारांना वेळ लागत होता.

या वेळीही तसेच काहीतरी कारण घडलेले असणार याची कल्पना अक्षयाच्या पडलेल्या चेहऱयाकडे पाहून आली. “काय झालं?’’ असे विचारताच तिने बोलायला सुरुवात केली, “मॅम, काल माझं आणि माझ्या पॅरेन्ट्सचं खूप वाजलं. त्या दोघांनीही काल मला खूप हर्ट केलं आहे. त्यांना मी कायम चिअरफुल असायला हवी. पण मला नाही वाटत तर काय करू? मला आता त्यांच्याबरोबर राहायलाही आवडत नाही.’’ हे सांगताना तिच्या डोळ्यांत पाणी आले.

अक्षया ही सव्वीस वर्षांची तरुणी होती. एका नामांकित कॉर्पोरेट कंपनीत नुकतीच नोकरीला लागली होती. तिच्या आवडीची कंपनी आणि मनाजोगता पगार यामुळे तिने त्या ठिकाणी स्थिर होण्याचा निर्णय घेतला होता, पण काही दिवसांतच तिला कामाचा आणि तिथल्या वातावरणाचा ताण यायला लागला. तिच्या ताणाचे महत्त्वाचे कारण होते ते म्हणजे तिने डॉक्टरांना न विचारताच तिला चालू असलेल्या नैराश्य आणि नकारात्मक विचारांवर मात करण्यासाठीच्या गोळ्या तसेच समुपदेशन बंद केले होते. हे सर्व बंद करण्यामागे अक्षयाचे आई-वडील जास्त जबाबदार होते हे त्यांना तिच्याकरवी सत्रांमध्ये बोलावल्यावर कळले.

अक्षयाच्या घरी तिचे आई-वडील हे दोघेही उच्चशिक्षित होते, पण मानसिक स्वास्थ्य आणि उपचार याबाबतीत दोघेही उदासीन होते असेच म्हणता येईल. कारण त्या दोघांच्याही मनात मानसोपचारांबद्दल चुकीच्या संकल्पना होत्या. नैराश्य हे आळशीपणाचे दुसरे नाव असून कामे टाळण्याचा एक प्रकार आहे. तसेच या समस्येसाठी गोळ्या आणि समुपदेशन म्हणजे फॅशन आहे. आपली मुलगी ही फक्त तिच्या आळशीपणाचे नाटक करून स्वतचे लाड करून घेते आहे या गैरसमजापोटी ते दोघेही अक्षयाला, तिच्या अतिरिक्त ताणाला समजून घेत नव्हते. अक्षयाला ताण सहन होईनासा झाला की ती स्वतला कोंडून घेई.

“मला आतून जो काही त्रास होतोय तो या दोघांना समजतच नाहीये. मला आतून रिकामं वाटतं, एकटं आणि असुरक्षित वाटतं. तेव्हा आईने मला जवळ घ्यावं असंही वाटतं; पण तेव्हाच आईला मी लाडात आलेय असं वाटतं आणि ती माझ्याकडे मुद्दामहून दुर्लक्ष करते.’’ अक्षयाने भरल्या डोळ्यांनी जसं सांगितलं तशी तिच्या आईने नजर चुकवली आणि म्हणाली, “मला अक्षयाला स्ट्राँग बनवायचंय.’’ तिच्या वडिलांनीही मान हलवली.

“मला वाटतं, आपण आताच्या अक्षयाच्या प्राप्त परिस्थितीचा आणि तिच्या सध्याच्या मनःस्थितीचा विचार करू या,’’ असे सांगताच ते दोघं विचारात पडले. त्यांच्याशी बोलताना हे स्पष्ट जाणवले होते की, त्या दोघांनी ‘मानसिक समस्या ही आपल्या मुलीलाही असू शकते’ या शक्यतेचा स्वीकार केलेलाच नव्हता आणि म्हणूनच अक्षयाच्या समस्येकडे ते दोघे त्यांच्याही नकळत दुर्लक्ष करीत होते. पण त्याचा परिणाम अक्षयावर झाला होता आणि त्यामुळेच तीही स्वतकडे दुर्लक्ष करत गेली.
अक्षयाबरोबर तिच्या पालकांना काही गोष्टींची समज देण्याची वेळ आली होती. सर्वात पहिल्यांदा, त्यांच्या मनात असलेल्या तिच्या नैराश्यासंबंधी मानसशास्त्राrय माहिती समजवण्यात आली. तसेच त्यांच्या शंकांचे निरसन करून उपचारांचे महत्त्वही पटवण्यात आले. यानंतर अक्षया व तिचे पालकही तिच्याबरोबर सत्रांना येऊ लागले.

आज बऱयाच मानसिक अस्वास्थ्य आणि त्यावर उपचार घेत असलेल्या व्यक्तींना या सर्वात मोठय़ा अडचणीला सामोरे जावे लागत आहे. स्वतच्या हक्काच्या माणसांकडून जर आधार मिळाला नाही तर अशा व्यक्ती ज्या आधीच मनाने कमकुवत झालेल्या असतात त्या ढासळतात. म्हणूनच मानसिक स्वास्थ्यावर उपचार घेणाऱया व्यक्तीबरोबरच तिच्या घरच्या सदस्यांचेही समुपदेशन होणे अत्यंत आवश्यक झाले आहे. कारण मनाशी संबंधित समस्यांवर आज बऱयाच उपचार पद्धती आणि त्यातील तज्ञ मंडळीदेखील आहेत, पण घरातून मिळणारा ‘आम्ही आहोत’ हा दिलासा रुग्णाला पन्नास टक्के बरा करू शकतो. अक्षयाबद्दल सांगायचे झाल्यास तिचे मानसोपचार व्यवस्थित चालू आहेत. तिचे आई-वडीलही तिच्याकडे लक्ष ठेवून आहेत. अक्षयाचे आणि त्यांचे संबंधही सलोख्याचे झाले आहेत.

[email protected] (लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सर्वात मोठी बातमी, अवकाळीचा मुंबईकरांना तडाखा, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा सर्वात मोठी बातमी, अवकाळीचा मुंबईकरांना तडाखा, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडवून दिली आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांना अनेक...
Mumbai and Thane Rain | मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मेघगर्जनेसह पाऊस, उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा
जिद्दीला सलाम… फक्त पाणी पिऊन जिवंत, लास्ट स्टेजवर असतानाही मतदान; कोण आहे ही महिला?
मुंबईत वादळी पावसाचा धुमाकूळ; रेल्वे वाहतूकीचा खोळंबा, रस्ते वाहतूक संथ गतीनं
घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळलं; अनेक जण अडकल्याची भीती, 7 ते 8 जण जखमी
भाजपला बहुमत मिळणार नाही, राजकीय विश्लेषकाची पोस्ट व्हायरल
भाजपच्या उमेदवारानं मुस्लिम महिलांना ओळखपत्र मागितलं; तपासणीसाठी बुरखा हटवण्यास सांगितल्यावरून वाद