नवी दिल्ली | Twitter चे अनेक हँडल हॅक झाल्याचे उघड झाल्यामुळे भारताच्या कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (Computer Emergency Response Team, India – CERT-IN) चौकशी सुरू केली आहे. भारताच्या सीईआरटीने ट्विटरला या प्रकरणात नोटीस बजावली आहे. हॅकिंगमुळे किती भारतीयांची ट्विटर हँडल हॅक झाली आणि त्यांचे कशा स्वरुपाचे नुकसान झाले याची माहिती भारताने मागितली आहे. ट्विटरकडून उत्तर येताच पुढील चौकशी सुरू होणार आहे.
थेट ट्विटरच्या सर्व्हरवर हल्ला झाला की विशिष्ट कंटेंटसोबत दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यामुळे ट्विटर हँडल हॅक झाली याची माहिती भारताने मागितली आहे. हॅकिंग करुन प्रामुख्याने कोणत्या माहितीची चोरी झाली हे कळवा, असेही भारताने ट्विटरला सांगितले आहे. हल्ल्याचे स्वरुप या विषयावर भारताने ट्विटरकडून सविस्तर उत्तर मागितले आहे. हॅकिंग झाल्याचे ट्विटरच्या कधी लक्षात आले तसेच नंतर केलेले उपाय आणि त्याचे परिणाम या संदर्भात सविस्तर माहिती द्या, असेही भारताने ट्विटरला सांगितले आहे. ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर १५ आणि १६ जुलै रोजी सायबर हल्ला झाला. यात अनेक राजकीय नेते, उद्योगपती, गुंतवणूकदार यांची ट्विटर हँडल हॅक झाली. हॅक झालेल्या हँडलवरुन साधारपणे एक सारखा दिसणारा मेसेज ट्वीट झाला. यात बिटकॉइन स्वरुपात जेवढे पैसे द्याल त्याच्या दुप्पट रक्कम अल्पावधीत परत देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या कंपन्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलचेही हॅकिंग झाले होते.