परवा बदलापूर, आज पुणे… शिवरायांच्या राज्यात जो न्याय….; स्वारगेट घटनेवर दिग्दर्शक संतापला
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकामध्ये खळबळजनक घटना घडली आहे. एका २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आला. मंगळवारी पहाटे घडलेल्या या घटनेचा गुन्हा संध्याकाळी दाखल करण्यात आला. तोपर्यंत आरोपी त्याच्या गावात फिरत होता. परंतु त्याला गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाल्यावर तो फरार झाला. या प्रकरणावर सर्वजण प्रतिक्रिया देताना दिसत आहे. दरम्यान, दिग्दर्शक अक्षय इंडिकरने केलेल्या सोशल मीडिया पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याने पोस्टमध्ये आरोपीला सार्वजनिक ठिकाणी शिक्षा दिली तरच अशा घटना थांबतील असे म्हटले आहे.
अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेला दिग्दर्शक अक्षय इंडिकरने स्वारगेट येथे घडलेल्या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. त्याने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने, ‘पुण्यात स्वारगेट सारख्या ठिकाणी बलात्कार होतायत? शिवरायांच्या राज्यात जो न्याय लावत होते त्या न्यायाने आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्टात खेचून, जरब शिक्षा होईल आणि ती शिक्षा सार्वजनिक स्वरुपात दिली तरच या घटना थांबतील. परवा बदलापूर आज पुणे’ असे म्हटले आहे.
पुढे त्याने या पोस्टमध्ये मराठी भाषा दिनाचा देखील उल्लेख केला आहे. ‘मराठी भाषा दिवस त्यातल्या माणसांच्या सन्मानाचा आया बहिणींच्या आदरचाही हवा ना? निव्वळ एक घटना आहे की असंवेदनशीलतेचा हा व्हायरस अक्राळ विक्राळ होण्याआधी, सुरक्षा राखली गेली पाहिजे. स्वातंत्र्याचा मूलभूत मानवी हक्क ?? सगळ्यांना निर्भयपणे मुक्तपणे स्वातंत्र्याने फिरता आले पाहिजे’ असे अक्षयने पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे.
आरोपीचा कसून शोध
स्वारगेट बसस्थानकात सोमवारी ही घटना घडली आहे, या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली आहे. वातावरण तापलं असून, पोलिसांकडून आरोपीचा सर्वत्र शोध सुरू आहे. आरोपी ज्या गावात राहातो त्या गावाला तर छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. ड्रोनच्या मदतीनं पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List