अक्रोड की बदाम… मेंदूला तल्लख ठेवण्यासाठी जास्त फायदेशीर काय?
आपला मेंदू हा शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. त्यामुळे मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण आपल्या डाएट फूडमध्ये अक्रोड आणि बदामाचा समावेश करत असतो. त्याचबरोबर मानसिक आरोग्य आणि तल्लख स्मरणशक्तीसाठी अक्रोड आणि बदामाचे सेवन अधिक फायदेशीर ठरते, हे केवळ मानसिक विकासाला चालना देत नाहीत तर यामुळे मेंदूचे कार्य अधिक सुधारते. यात बदामांमध्ये असलेले व्हिटॅमिन ई, अँटीऑक्सिडंट्स आणि हेल्दी फॅट असतात, जे मेंदूला सक्रिय ठेवतात आणि स्मरणशक्ती देखील वाढवतात. तसेच अक्रोडला “ब्रेन फूड” म्हंटले जाते. कारण यामध्ये असलेले ओमेगा-३ फॅटी ॲसिडने समृद्ध असते, जे मेंदूचे न्यूरॉन्स मजबूत करण्यास आणि विचार करण्याची तसेच समजून घेण्याची क्षमता वाढविण्यास मदत करतात.
अशा परिस्थितीत मेंदूला तल्लख करण्यासाठी अक्रोड अधिक फायदेशीर आहे की बदाम जास्त प्रभावी आहे, याबाबत अनेक लोकांच्या मनात प्रश्न उपस्थितीत राहतात. तुम्हालाही याचे उत्तर जाणून घ्यायचे असेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. या लेखात आपण आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. किरण गुप्ता यांच्याकडून जाणून घेऊया की मेंदूला तल्लख ठेवण्यासाठी अक्रोड की बदाम जास्त फायदेशीर? चला जाणून घेऊयात.
बदाम की अक्रोड फायदेशीर?
डॉ. किरण गुप्ता सांगतात की जर बदाम आणि अक्रोडमध्ये तुलना केली तर अक्रोड हे मेंदूसाठी थोडे अधिक प्रभावी मानले जाते कारण त्यात ओमेगा-३ फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते, जे मेंदूच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. अक्रोडचे सेवन केल्याने स्मरणशक्ती सुधारण्यास, लक्ष केंद्रित करण्यास आणि न्यूरॉन्स मजबूत करण्यास मदत होते. तसेच तज्ज्ञांच्या माहितीनुसार संशोधनात असेही आढळून आले आहे की जी लोकं नियमितपणे अक्रोड खातात त्यांना डिमेंशिया आणि अल्झायमर सारख्या आजारांचा धोका कमी असतो. तेव्हा अक्रोड नेहमी भिजवून आणि योग्य प्रमाणात खावेत.
बदाम फायदेशीर नाहीत का?
मेंदूच्या आरोग्यासाठी अक्रोड अधिक फायदेशीर मानले जाते तर बदाम फायदेशीर नाही का? असा प्रश्न तुमच्या देखील मनात उपस्थित होणे देखील स्वाभाविक आहे. तर यावेळी डॉ. किरण गुप्ता यांनी सांगितले की बदाम मेंदूसाठी देखील फायदेशीर आहे. बदामांमध्ये व्हिटॅमिन ई, अँटीऑक्सिडंट्स आणि हेल्दी फॅट असतात, ज्यामुळे मेंदू सक्रिय राहतो आणि मानसिक थकवा कमी होतो. विशेषतः भिजवलेले बदाम स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करतात.
पण थेट तुलना केल्यास, ओमेगा-३ चे प्रमाण जास्त असल्याने अक्रोड मेंदूसाठी थोडे अधिक प्रभावी असतात. जर तुम्हाला योग्य पद्धत अवलंबायची असेल तर तुमच्या आहारात अक्रोड आणि बदाम यांचा समावेश करा. सकाळी ४-५ भिजवलेले बदाम खा आणि दररोज २-३ अक्रोड खा. यामुळे तुमचं मन स्थिर राहील, त्याचबरोबर एकाग्रता सुधारेल आणि मानसिक थकवाही दूर होईल. जर तुम्हाला कोणताही गंभीर आजार असेल किंवा तुम्ही कोणताही उपचार घेत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच तुम्ही तुमच्या आहारात बदल करावेत.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List