लग्नाच्या 37 वर्षांनंतर गोविंदाला देणार घटस्फोट? अखेर सुनिताने सोडलं मौन, म्हणाली “हे खरं..”
लग्नाच्या 37 वर्षांनंतर गोविंदा आणि सुनिता अहुजा घटस्फोट घेण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. सुनिताने गेल्या काही मुलाखतींमध्ये गोविंदाविषयी जे वक्तव्य केलं होतं, ते पाहून या दोघांमध्ये नक्कीच सर्वकाही आलबेल नसल्याची चाहत्यांना शंका होती. अशातच गोविंदाच्या मॅनेजरने बुधवारी खुलासा केला होता की, सुनिताने सहा महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. यानंतर गोविंदाच्या विवाहबाह्य संबंधाच्याही चर्चा चघळल्या गेल्या. 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर असल्याने सुनिताने घटस्फोटाचा निर्णय घेतल्याचं म्हटलं गेलं. या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर आता सुनिताची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
सुनिताने तिच्या मॅनेजरमार्फत घटस्फोटाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. “हे सर्व खरं नाही” असं तिने म्हटलंय. तर गोविंदाच्या मॅनेजरने याबाबत म्हटलंय की, “त्या दोघांमध्ये आता सर्वकाही ठीक आहे. पती-पत्नीच्या नात्यात अशा गोष्टी होत असतात. त्यांचं नातं मजबूत आहे. दोघं वेगवेगळे राहत असल्याच्या चर्चांवर बोलायचं झाल्यास, मी हे स्पष्ट करू इच्छितो की खासदार झाल्यानंतर गोविंदाने ऑफिशियल कामांसाठी बंगला खरेदी केला होता. गोविंदा तिथेच सर्व मिटींग्स घेतो. काम अधिक असल्यास आणि उशीर झाल्यास तो त्याच बंगल्यात झोपतो. मात्र याचा अर्थ असा नाही की तो त्याच्या कुटुंबीयांसोबत नाही.”
काही दिवसांपूर्वी सुनिताने एका मुलाखतीत सांगितलं होतं की ती आणि गोविंदा वेगळे राहत आहेत. मात्र नंतर तिने स्पष्ट केलं की कोणीही त्यांना वेगळं करू शकत नाही. सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा पसरल्यानंतर गोविंदाने अखेर ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यावर मौन सोडलं. तो म्हणाला, “मी सध्या माझ्या आगामी चित्रपटाच्या कामात खूप व्यस्त आहे.” गोविंदाने घटस्फोटाबाबत थेट काही स्पष्टीकरण दिलं नाही. त्यामुळे या दोघांच्या नात्यात नक्कीच काही समस्या सुरू असल्याचा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत.
फिल्म इंडस्ट्रीत काम करण्याच्या आधीपासूनच गोविंदा आणि सुनिता एकमेकांसोबत आहेत. सुनिताच्या वडिलांचा त्यांच्या नात्याला विरोध होता. म्हणून ते मुलीच्या लग्नालाही उपस्थित नव्हते. गोविंदाने बॉलिवूडमध्ये काम करायला सुरुवात केल्यानंतर सुनिताशी गुपचूप लग्न केलं होतं. या दोघांना जेव्हा मुलगी झाली, तेव्हा लग्नाबद्दल सर्वांना माहीत झालं होतं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List