झहीरसोबत लग्नाच्या 9 महिन्यांनंतर धर्मांतराविषयी सोनाक्षी स्पष्टच बोलली, “मला माझा धर्म..”
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने 23 जून 2024 रोजी बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न केलं. घरातच मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत या दोघांनी ‘स्पेशल मॅरेज ॲक्ट’अंतर्गत नोंदणी पद्धतीने लग्न केलं. सोनाक्षी हिंदू आणि झहीर मुस्लीम असल्याने या दोघांना बऱ्याच ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. याविषयी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनाक्षी मोकळेपणे व्यक्त झाली. “झहीर आणि मी धर्माकडे पाहतच नाही. आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करतो आणि आम्हाला एकमेकांशी लग्न करायचं होतं. मग लग्न करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय काय होता? तो त्याचा धर्म माझ्यावर थोपत नव्हता किंवा मी माझा धर्म त्याच्यावर थोपत नाही. आमच्यात याबद्दल संवादच झाला नाही. आम्ही कधी बसून यावर बोललोच नाही,” असं ती ‘हॉटलफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.
याविषयी तिने पुढे सांगितलं, “आम्ही एकमेकांच्या संस्कृतीचा आदर करतो, आम्हाला एकमेकांच्या संस्कृतीविषयी माहिती आहे. ते त्यांच्या घरी काही परंपरांना जपतात आणि माझ्या घरी आम्ही काही परंपरांना जपतो. माझ्या घरी जेव्हा दिवाळीत पूजा होते, तेव्हा तो त्या पुजेला येऊन बसतो. मी त्यांच्या घरी नियाजला बसते. माझ्यासाठी हे सर्व पुरेसं आहे. ते माझा आणि माझ्या संस्कृतीचा आदर करतात आणि मीसुद्धा त्यांच्या संस्कृतीचा आदर करते. किंबहुना हे असंच असलं पाहिजे.”
“आम्हाला लग्न करायचं होतं, तर यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्पेशल मॅरेज ॲक्ट. जिथे मी एक हिंदू असून, मला माझा धर्म बदलायचा नव्हता आणि तो मुस्लीम होता. आमच्या नात्याला आम्हाला लग्नाचं नाव द्यायचं होतं, मग त्यासाठी स्पेशल मॅरेज ॲक्टसारखा दुसरा चांगला पर्याय असूच शकत नाही. तू धर्मांतर करणार का, असं करणार का, तसं करणार का.. असे प्रश्न कधीच मला विचारले गेले नाहीत,” असं सोनाक्षीने स्पष्ट केलं.
झहीरसोबतच्या लग्नावरून सोशल मीडियावर सोनाक्षीला बरंच ट्रोल करण्यात आलं होतं. याविषयी ती पुढे म्हणाली, “लग्नापूर्वी बरेच लोग इतकी बडबड करत होते की त्याला स्वीच ऑफ हाच पर्याय उरला होता. म्हणूनच आम्ही आमचं कमेंट्स सेक्शन बंद करून ठेवलं होतं. माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठ्या दिवशी, ज्या दिवसाची मी इतक्या वर्षांपासून प्रतीक्षा करत होते, त्यादिवशी मला हे सर्व बकवास बघायचंच नव्हतं. त्यामुळे आम्ही ज्याप्रकारे लग्न केलं, त्यात फक्त असेच लोक होते जे आमच्यावर खूप प्रेम करतात आणि आमच्या नात्याचा सन्मान करतात.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List