मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला ; आता प्रतिक्षा निधीची
>> मेधा पालकर, पुणे
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला खरा मात्र त्यासाठी असलेला निधी कधी मिळणार?, भाषेला दर्जा मिळायला एका तपाची तपश्चर्या करावी लागली. आता निधीसाठी किती प्रतीक्षा करावी लागणार याकडे आता लक्ष लागले आहे. आता पर्यंत संस्कृत, मल्याळम, कन्नड, तेलगु, उडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. या सर्व भाषांना अभिजात दर्जा मिळाल्यानंतर त्या भाषेच्या विकासासाठीचा निधीही मिळाला आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी किती आणि कधी निधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, मराठी भाषा दिनाच्यानिमित्ताने तो लवकर मिळावा अशी अपेक्षा मराठी सारस्वत व्यक्त करत आहेत.
अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या भाषांमध्ये संस्कृत ही भाषा 28000 लोकं बोलतात, त्यासाठी तिला 262 कोटींचा निधी केंद्र शासन देते. त्यानंतर कन्नड, तेलगु, मल्याळम, उडिया, या चार भाषांना मिळून 64 कोटींचा निधी मिळतो. आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्यासाठी किती निधी मिळणार आणि तो कधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिच्या विविध बोलींचा अभ्यास, त्यांचे संशोधन, त्यातील साहित्याचा संग्रह, हिंदुस्थानातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणे, प्राचीन ग्रंथ अनुवादित करणे, महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालयांना सशक्त करणे, मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणे अशा सर्व गोष्टी अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर निधीमधून कराव्या लागतात. त्यामुळे हे सर्व करण्यासाठी निधी वेळेत मिळायला हवा अशी विचारणा केली जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागानेही त्यांच्या वेबसाईटवर अभिजात दर्जा मिळण्याचे भाषा संवर्धनासाठी हे फायदे सांगितले आहेत. त्यामुळे केंद्र शासन किती वेळेत हा निधी देणार, महाराष्ट्र सरकार त्यासाठी पाठपुरावा करणार का हे महत्वाचे आहे.
केंद्र सरकारने जारी केलेल्या निवेदनात मराठीला आणि अन्य भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे नोकरीच्या संधीत वाढ होतील. विशेषत: सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होतील. त्याचबरोबर संवर्धन, माहिती गोळा करणं, या भाषांमधील पुरातन साहित्याचं डिजिटलायझेशन यामुळे भाषांतर, नोंद, विविध साहित्याचं प्रकाशन तसंच डिजिटल माध्यमात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील, असे म्हटलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने निधीही वेळेत उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मराठी भाषिक करत आहेत.
एखादी भाषा ‘अभिजात’ कशी ठरते?
कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत. गृह मंत्रालयाने 2005 साली हे अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिले. त्याचे काय निकष आहेत?
* भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतीव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे 1500-2000 वर्षं जुना हवा.
* प्राचीन साहित्य हवं, जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटतं.
* दुसर्या भाषासमूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी.
* ‘अभिजात’ भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी.
मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी काय संघर्ष करावा लागला?
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा संघर्ष हा आजचा नाही. मराठीच्या अभिजात दर्जाबद्दल संशोधन करून तसा अहवाल केंद्र सरकारला देण्यासाठी 2012 साली प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली होती.2013 साली या समितीने आपला अहवाल प्रकाशित केला. महारट्ठी-महरट्ठी-मऱ्हाटी-मराठी असा मराठीचा उच्चार बदलत गेला असं या अहवालात म्हटलं आहे. महाराष्ट्री भाषा ही महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित होती आणि मराठीचं वय किमान अडीच हजार वर्षं जुनं असल्याचे पुरावे असल्याचं या अहवालात म्हटलं होतं. अकरा कोटी लोकांची मराठी जगातली 10 व्या ते 15 व्या क्रमांकाची भाषा आहे. देशातली ती एक महत्त्वाची राष्ट्रीय भाषा आहे. तिच्या ऐतिहासिक प्रवासाचे संदर्भ देत आणि विविध शतकांमध्ये विविध साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाचा विचार करून तिचं अभिजातपण स्वयंसिद्ध आहे असंही या अहवालात म्हटलं आहे. त्यानंतर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला.
“मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून साहित्य क्षेत्रातली जुनी, आद्य संस्था महाराष्ट्र साहित्य परिषदेने सातत्याने लढा दिला. राजकीय इच्छाशक्तीमुळे अभिजात दर्जा मिळाला. तशीच राजकीय इच्छाशक्ती निधीच्या बाबतीत दाखविण्याची गरज आहे.”
– प्रा. मिलिंद जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List