पुण्यात ‘निर्भया’कांड; स्वारगेट डेपोत शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार, अवघा महाराष्ट्र सुन्न, शिंदे–फडणवीसांच्या लाडक्या बहिणी असुरक्षित

पुण्यात ‘निर्भया’कांड; स्वारगेट डेपोत शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार, अवघा महाराष्ट्र सुन्न, शिंदे–फडणवीसांच्या लाडक्या बहिणी असुरक्षित

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्यात संस्कृतीला काळिमा फासणारी घटना घडली असून या घटनेने दिल्लीतील ‘निर्भया कांड’प्रमाणे संपूर्ण देशाला हादरवून टाकले. स्वारगेट एसटी आगारात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर ताई… ताई म्हणून, तिची दिशाभूल करून, एका नराधमाने बलात्कार केला. बलात्कार करून पसार झालेल्या आरोपीचा छडा लावण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. लोकांची वर्दळ असणाऱया या भागात मंगळवारी पहाटे 5च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला असून शिंदे-फडणवीसांच्या राज्यात लाडक्या बहिणी असुरक्षित असल्याचे या घटनेवरून पुन्हा समोर आले.

ताई… ताई म्हणून दिशाभूल

फलटणची ही तरुणी, परिचारिका असून औंध परिसरात राहते. मंगळवारी पहाटे तरुणी फलटणला जाण्यासाठी स्वारगेट डेपोत आली. त्यावेळी आरोपी दत्तात्रय गाडे तिच्याजवळ आला. तिच्यासोबत गप्पा मारून, गोड बोलून, ताई… ताई म्हणून ती कुठे जाणार आहे, अशी विचारणा केली. तिने फलटणला जायचे असल्याचे सांगताच, आरोपीने तिला बस दुसऱया ठिकाणी थांबल्याचे सांगितले. माझी एसटी याच ठिकाणी थांबते, तिकडे जाणार नाही, असे तिने सांगितले. त्यावर मी 10 वर्षांपासून एसटी स्थानकात ये-जा करतो. मला माहिती आहे, तुमची बस दुसऱया बाजूला उभी आहे असे त्याने सांगितले. तरुणी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन, काळोखात असलेल्या शिवशाही बसकडे गेली. तिच्या पाठोपाठ गाडेही गेला. एसटीत लाईट नाही, दरवाजा बंद असल्याचे तिने सांगितले. परंतु, आरोपीने प्रवाशी आतमध्ये झोपले असून, तू मोबाईलची लाईट लावून जा, असे सांगितले. तरुणीने बसमध्ये प्रवेश करताच आरोपीही तिच्यामागून आत शिरला. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला.

पीडितेला ठार मारण्याची धमकी

अत्याचार केल्यानंतर नराधमाने पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेची कोणाकडे वाच्यता केल्यास तुला जीवे मारेन, असे त्याने धमकावले. मात्र, पीडितेने धीर एकवटून मित्राला फोन केला आणि सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर आज पोलिसांकडे तक्रार करण्यात आली.

  • दत्तात्रय रामदास गाडे (वय 35, रा. शिक्रापूर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध स्वारगेट, शिरूर, शिक्रापूर पोलीस ठाणे अंतर्गत जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. स्वारगेट-फलटण बसला कंडक्टर नव्हता. ते हेरत गाडेने कंडक्टर असल्याचे सांगून तरुणीला फसवले.
  • पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपीची ओळख पटविली आहे. आरोपीवर चोरीचे अनेक गुन्हेही दाखल आहेत. त्याच्या शोधासाठी स्वारगेट पोलिसांसह गुन्हे शाखेची 8 पथके रवाना केली आहेत, असे पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले.

23 सुरक्षा रक्षक निलंबित

स्वारगेट बस आगारातील भयंकर घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर कारवाईचे पहिले पाऊल उचलण्यात आले आहे. आगारातील 23 सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आले असून उद्यापासून नवीन सुरक्षा रक्षक नेमण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले. स्वारगेट आगाराचे व्यवस्थापक आणि वाहतूक नियंत्रकांची चौकशी करून आठवडाभरात चौकशी अहवाल देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

आरोपीला फाशी व्हावी – अजित पवार

ही घटना दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. या गुह्यातील आरोपीने केलेला गुन्हा अक्षम्य असून त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा गुन्हा गांभीर्याने घेतला असून पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

परिवहन मंत्री कुठे आहेत – वडेट्टीवार

गृह खाते महिला सुरक्षेच्या बाबतीत आणखी किती ढिसाळ कामगिरी करणार ? एसटी प्रशासन जबाबदारी घेणार का? इतके होत असताना स्वारगेट बस स्थानकात कर्मचारी काय करत होते? परिवहन मंत्री कुठे आहेत? असा संतप्त सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

शिवसैनिकांनी डेपोतील सुरक्षा कार्यालय फोडले

बलात्काराच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. संतप्त शिवसैनिकांनी डेपोतील सुरक्षा रक्षक कार्यालय फोडले. शिवसेना पक्षाचे राज्य संघटक वसंत मोरे यांच्यासह शिवसैनिकांनी स्वारगेट डेपोवर धडक दिली. सुरक्षा रक्षक कार्यालयाच्या समोरच असलेल्या बसमध्ये बलात्काराची घटना घडली, त्यास सुरक्षा रक्षकही तेवढेच जबाबदार असून त्यांच्यावरदेखील बलात्काराचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी मोरे यांनी केली. शिवसैनिकांनी अधिकाऱयांना चांगलेच धारेवर धरले.

  • सव्वीस तासांनंतर ही बातमी बाहेर आली. स्वारगेट डेपो प्रमुखाला हा प्रकार माहिती होता. त्याला यामध्ये आरोपी करा. त्याला या डेपोमध्ये थांबण्याचा अधिकार नाही. त्याचे निलंबन तात्काळ झाले पाहिजे, असेही मोरे यांनी सांगितले.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ट्रम्प यांच्या धमकीनंतर झेलेन्स्की अमेरिकेला भेट देणार, रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा निघणार? ट्रम्प यांच्या धमकीनंतर झेलेन्स्की अमेरिकेला भेट देणार, रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा निघणार?
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की हे येत्या शुक्रवारी अमेरिकेला भेट देणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी कॅबिनेट बैठक घेतली....
एसटीचा स्वारगेट डेपो गर्दुल्ले, गुंडांचे आगार, पोलीस, एसटी प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष
पुण्यात ‘निर्भया’कांड; स्वारगेट डेपोत शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार, अवघा महाराष्ट्र सुन्न, शिंदे–फडणवीसांच्या लाडक्या बहिणी असुरक्षित
जम्मू–कश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला
मुंबई आणि ठाण्यात म्हाडा वृद्धाश्रम उभारणार
मराठी पदव्युत्तर कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहन भत्ता रद्द, ठाणे पालिकेचा तुघलकी फतवा
भुमरे, तानाजी सावंत, सत्तार, राठोड यांचे ओएसडी ‘फिक्सर’, मित्रपक्षाचाच आरोप