Rajan Salvi with Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्यासमोरच राजन साळवी यांनी सांगितले शिवसेनेत काय हवे…
Rajan Salvi with Eknath Shinde: कोकणातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाला गुरुवारी मोठा झटका बसला. उद्धव ठाकरे यांचे एकनिष्ठ असलेले राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी राजन साळवी यांनी भावनिक भाषण केले. तसेच माध्यमांमध्ये सुरु असलेल्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काय हवे? ते ही सांगितले. राजन साळवी विधान परिषदेत पाठवले जाणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहे. त्यावर राजन साळवी यांनी स्पष्टपणे आपले मत मांडले.
काय म्हणाले राजन साळवी
विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत झालेला पराभव आपण मान्य केल्याचे राजन साळवी यांनी सांगितले. ते म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यात आता शतप्रतिशत शिवसेना करणार आहे. मी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केल्यावर बातम्या सुरु झाल्या. राजन साळवी यांना विधान परिषद देणार किंवा मोठी जबाबदारी देणार असल्याचे म्हटले जावू लागले. परंतु मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. मला शिवसेना पक्षाच्या माध्यमातून सर्व काही मिळाले. मला काहीच नको. मला फक्त माझ्यासोबत राजापूर मतदार संघातील आलेले शिवसैनिक, पदाधिकारी यांचा योग्य सन्मान व्हावा, हीच अपेक्षा आहे. उदय सामंत पालकमंत्री आहेत. त्यांनीही मला छोटा भाऊ म्हणून समावून घ्यावे, असे राजन साळवी यांनी सांगितले.
एका डोळ्यात दु:खाचे अश्रू, दुसऱ्या डोळ्यात आनंदाअश्रू
राजन साळवी म्हणाले, ९ फेब्रुवारी रोजी मी एकनाथ शिंदे यांना भेटलो. त्यांच्याकडे शिवसेनेत येण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी मला कुटुंबात घेण्याची तयारी दर्शवली. आज माझ्या दोन्ही डोळ्यात अश्रू आहेत. ३८ वर्ष शिवसेनेत असताना नगरसेवकापासून विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. या संपूर्ण वाटचालीत तो पक्ष सोडून नवीन घरात यावे लागत आहे, त्यामुळे एका डोळ्यात दु:खाचे अश्रू आहेत. दुसऱ्या डोळ्यात आनंदअश्रू आहे. कुटुंबात परत येत आहे. शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्यासोबत जावू शकलो नाही, ही खंत आहे. पण त्या वेळी वेगळी परिस्थिती होती.
एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
उदय सांमत यांनी शिवसेनेत राजन साळवी यांचे स्वागत केले. ते म्हणाले, ज्या ठिकाणी शिंदे साहेबांची ताकद वाढणार आहे, त्या ठिकाणी सर्व तडजोडी करण्यास मी तयार आहे. मी पालकमंत्री म्हणून विकास कामे करणार आहे. रत्नागिरी जिल्हा संपूर्ण धनुष्यबाणमय करणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना जोरदार टोले लगावले. माझी लाइन कापण्यापेक्षा तुमची लाइन वाढवा असा सल्ला देत ते म्हणाले, एकनाथ शिंदे जिथे उभे राहते तिथून लाइन सुरु होते. आत्मपरीक्षण करा तुमच्याकडील लोक का तुम्हाला सोडून जात आहात. शिवसेना हा कार्यकर्ता घडवणारा पक्ष आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List