32 वर्षीय रॅपरने संपवलं आयुष्य; पत्नीच्या जाचाला कंटाळून टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप
ओडिशामधील प्रसिद्ध रॅपर अभिनव सिंहने बेंगळुरूमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनव 32 वर्षांचा होता. तो ‘जगरनॉट’ म्हणूनही ओळखला जायचा. पत्नीकडून झालेल्या चुकीच्या आरोपांमुळे मानसिक तणावाखाली येऊन त्याने विष प्राशन केल्याची माहिती समोर येत आहे. बेंगळुरूमधील कडुबीसनाहल्ली याठिकाणी अभिनवचं अपार्टमेंट आहे. याच राहत्या घरी त्याने आपलं आयुष्य संपवलं. याप्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अभिनवच्या आत्महत्येचं नेमकं कारण, याचा शोध पोलीस घेत आहेत. स्थानिक पोलिसांनी अभिनवचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवला आहे. अभिनवच्या कुटुंबीयांनी त्याच्या पत्नीवर आरोप केले आहेत. पत्नी आणि सासरकडच्या इतर मंडळींनी त्याचा मानसिक छळ केल्याचा आरोप अभिनवच्या कुटुंबीयांनी केला आहे.
पत्नीवर आरोप
ओडिशा टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, याप्रकरण पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुलाच्या आत्महत्येप्रकरणी अभिनव सिंहचे वडील विजय नंदा सिंह यांनी आठ ते दहा जणांवर आरोप केले आहेत. याप्रकरणी खोलवर तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. रॅपर अभिनव सिंह याआधीही विविध वादांमुळे चर्चेत होता. ऑगस्ट 2024 मध्ये ओडिया अभिनेत्री सुप्रियाने त्याच्यावर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. इतकंच नव्हे तर तिच्या म्युझिक व्हिडीओच्या प्रदर्शनात त्याने अडथळे निर्माण केल्याचं तिने म्हटलं होतं. याशिवाय पत्नीने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर तो भुवनेश्वरमधील ओयो हॉटेलच्या वादातही सापडला होता. अभिनव आणि त्याच्या पत्नीच्या नात्यात बऱ्याच समस्या होत्या असंही कळतंय.
अर्बन लोफरचा संस्थापक
अभिनव सिंह हा ‘अर्बन लोफर’चा संस्थापक होता. अर्बन लोफर हे ओडिशातील पहिलं स्वतंत्र हिप-हॉप लेबल आहे. ‘कटक अँथम’ या हिट गाण्यामुळे अभिनवला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. अभिनवच्या आत्महत्येनं चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, अभिनवच्या आत्महत्येप्रकरणी अद्याप त्याच्या पत्नीची कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List