साहित्य संमेलनात राजकीय लोकांना पुरस्कार कशासाठी – संजय राऊत
साहित्याशी कोणताही संबंध नसलेल्या राजकीय लोकांना साहित्य संमेलनात पुरस्कार कशासाठी? असा सवाल करतानाच दिल्लीतील मराठी साहित्य संमेलन ही राजकीय दलाली आहे, अशी तोफ शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज डागली.
दिल्लीत दलाली करायला आला आहात का? मराठीची काय सेवा केली तुम्ही? महाराष्ट्राच्या मानेवर पाय ठेवणाऱयांचा सत्कार करता तुम्ही?, असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांना केला.
हा भाजप आणि संघाचा उपद्व्याप
हे संमेलन म्हणजे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपद्व्याप आहे, असे शरसंधान संजय राऊत यांनी केले. या संमेलनाचे आपल्यालाही आमंत्रण आहे, पण आपण तिथे जाणार नाही. जो मराठी माणूस आहे तो तिथे जाणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्राचे राजकारण विचित्र दिशेने चाललेय
गेल्या काही काळात महाराष्ट्राचे राजकारण फार विचित्र दिशेने चालले आहे. कोण कोणाला टोप्या घालतेय आणि कोणाच्या टोप्या उडवतेय, कोण कोणाला गुगली टाकतेय आणि कोण स्वतःच हिट विकेट होत आहेत हे पुन्हा एकदा समजून घ्यावे लागेल, असेही राऊत पुढे म्हणाले.
पवारांनी शिंदेंचा सत्कार टाळायला हवा होता
सरहद संस्था यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आयोजक आहे. याच संस्थेचा पुरस्कार शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदान करण्यात आला. त्यावर संजय राऊत यांनी भाष्य केले. ज्याने महाराष्ट्राशी बेईमानी केली, शिवसेना फोडली, महाविकास आघाडीचे सरकार पाडले त्या शिंदेंचा सत्कार पवारांनी करायला नको होता, हा कार्यक्रम त्यांनी टाळायला हवा होता, ही शिवसेनेची भावना आहे. याबाबत कदाचित पवारांची भावना वेगळी असू शकते, असे संजय राऊत म्हणाले. हा शिंदेंचा नव्हे, तर महाराष्ट्र तोडणाऱया अमित शहांचा सत्कार आहे, असेही राऊत म्हणाले.
शिवसेना नेहमीच भान राखून पावले टाकते
काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात. शरद पवार आणि अजित पवारांचे गुप्तगू होत असेल तर तो त्यांचा वैयक्तिक, कौटुंबिक प्रश्न आहे. तरीही अजित पवारांनी शरद पवार यांचा पक्ष फोडला, कुटुंब फोडले याचे भान राखून शिवसेना पावले टाकत असते, याचीही आठवण संजय राऊत यांनी करून दिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List