रत्नागिरीत ट्रक उलटला, तीन जण गंभीर जखमी
मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी पुलानजिक आज बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सिमेंट वाहतूक करणारा ट्रक थेट खोदलेल्या चरित कोसळला. या अपघातात जे के फाईल-रत्नागिरी येथील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. यात एका महिलेचा देखील समावेश आहे. जखमींना नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या रूग्णवाहिकेतून जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. ठेकेदार ईगल कंपनीच्या मनमानी कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
या महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू असले तरी वाहतूकीला डोकेदुखी ठरेल असेच काहीसे काम ठेकेदार ईगल कंपनीमार्फत सध्या सुरू आहे. रत्नागिरी येथून सिमेंट भरून देवरुखच्या दिशेने ट्रक वाहतूक करत होता. आपल्या ताब्यातील ट्रक घेऊन चालक क्षीनोद शर्मा ( राहणार, जे. के. फाईल, वय 50) हा बावनदी पुलाजवळ आला असता रस्त्याच्या बाजूलाच खोदून ठेवलेल्या अंदाजे 25 ते 30 फूट खोल दरीत ट्रक कोसळून पलटी झाला. समोरून येणाऱ्या गाडीने ट्रकचालकाला हुलकावणी दिल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातग्रस्त ट्रकच्या एका बाजूचा भाग पूर्णपणे चेपून मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने 25 ते 30 फूट खोल दरीत कोसळूनही ट्रक चालकासह कमलेश छोटूराम रावस ( वय 42, रा. जे के फाईल), गुडिया कमलेश रावस (वय 40, रा. जे के फाईल ) असे एकूण तिघे बचावले असून ते गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच हातखंबा महामार्ग पोलिस केंद्राचे एएसआय घाग, एएसआय हलगी, हेड कॉन्स्टेबल संसारे यांच्यासह जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीजची रुग्णवाहिका दाखल होऊन जखमींना स्थानिकांच्या मदतीने रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या अपघात प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस पुढील कार्यवाही करीत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List