अभिव्यक्ती- त्या दोघींच्या जन्माची ‘चित्तरकथा’

अभिव्यक्ती- त्या दोघींच्या जन्माची ‘चित्तरकथा’

डॉ. मुकुंद कुळे

विठाबाई नारायणगावकर आणि हंसा वाडकर परंपरेने कलावंत म्हणून मान्यता पावलेल्या समाजातल्या. दोघींच्या आयुष्याचा शेवट तसा शोकात्मच झालेला दिसतो. मात्र या दोघीही कधीच आपल्या नशिबाला दोष देत बसल्या नाहीत. आयुष्य जसे समोर आले तसे त्या स्वीकारत गेल्या कारण कलेचा बंदा रुपया त्यांच्या मुठीत होता. मुंबई विद्यापीठाच्या ‘अकॅडमी ऑफ थिएटर आर्टस्’च्या विद्यार्थ्यांनी नुकतेच रंगभूमीवर सादर केलेले ‘विठाबाई’ आणि ‘आविष्कार’ने रंगभूमीवर आणलेले ‘सांगत्ये ऐका’ या दोन नाटय़कृती म्हणजे एकप्रकारे त्या दोघींच्या आयुष्याचा साजरा केलेला उत्सवच आहे.

विठाबाई नारायणगावकर आणि हंसा वाडकर या दोघींची एकत्र आठवण यायची तसे काही कारण नाही. पण कधीकधी योगायोग असे जबरदस्त असतात की, चक्रावून जायला होते. आता या दोघींचेच बघा ना, दोघीही एकदमच अवतरल्यात रंगभूमीवर आपल्या आयुष्याची चित्तरकथा सांगायला. बघायला गेले तर दोघींची कलाक्षेत्रे वेगवेगळी होती. विठाबाई नारायणगावकर तमाशातील लावणीसम्राज्ञी, तर हंसा वाडकरांनी रूपेरी पडद्यावर आपली कारकीर्द गाजवलेली. पण कलाक्षेत्रे वेगळी असली तरी, या दोघींची घराणी जवळ जवळ सारखीच होती. म्हणजे विठाबाई होत्या कोल्हाटी समाजातल्या आणि हंसाबाई होत्या कलावंतीण समाजातल्या. समाज वेगवेगळे खरे, पण त्यांचे मूळ काम एकच नाच-गाण्यातून मनोरंजन करणे. फक्त महाराष्ट्रातील कोल्हाटी समाज वर्षानुवर्षे आपल्या कलेतून लोकांचे मनोरंजन करत आला, तर प्रामुख्याने सिंधुदुर्गातील मंदिराश्रयी असलेला भावीण-नायकिणींचा समाज परंपरेने देवाचे मनोरंजन करत आला. अर्थात मूलत विशुद्ध कलेच्या पातळीवर असलेले मनोरंजन नंतर पुरुषसत्ताक समाजाने नासवले आणि मग या समाजातील महिलांचे केवळ शोषणच झाले. क्वचित कधी या स्त्रियांनीदेखील ते होऊ दिले. कारण समाजपुरुषाने त्यांच्यापुढे दुसरा पर्यायच खुला ठेवलेला नव्हता. पण मग एकदा का उतरल्याच त्या प्रवाहात तर मग या महिला खनपटीलाच बसायच्या एकेकाच्या. कलदार रुपयाप्रमाणे त्यांची खणखणीत कला तर त्यांच्याकडे असायचीच, पण बेरहम समाजाच्या आलेल्या अनुभवांच्या मुशीतून तावूनसुलाखून निघाल्यावर त्या काहीशा निगरगट्ट आणि निडरही व्हायच्या. मग समोरचा कितीही तालेवार असो, त्याच्या पुरुषत्वाचा आणि कर्तृत्वाचा पंचनामा करायला त्या मागेपुढे पाहायच्या नाहीत.

गेली काही वर्षे निमित्तानिमित्ताने या आयाबायांची आयुष्ये पाहतोय, ऐकतोय, वाचतोय आणि हैराण होतोय. त्यांचे नाव कधी उमराव असते, कधी बेगम, कधी बडी मोतीबाई, कधी रसुलनबाई, कधी जद्दनबाई, तर कधी वसंतसेना, आम्रपाली, मेनकाबाई, अंजनीबाई, गोदावरीबाई, भामाबाई. गायन आणि नृत्याचा हिंदुस्थानी अवकाश उजळून टाकणाऱया या साऱयाजणी काय भन्नाट आयुष्य जगल्यात. त्यांच्या परंपरेला मानले असेल काहींनी दूषित, बाधित, कलंकित, पण छट् काय फरक पडतो त्याने! झाली असेल त्यांची फरपट आयुष्यात, नसेल जगता आले त्यांना आयुष्य इतर चारचौघींसारखे. पण आपल्या कैफात जगली यातली प्रत्येकजण. मन आणि शरीर दोन्ही त्यांच्याच ताब्यात तर होते. क्वचित कधी शरीरावर पडायच्या बळजबरीच्या झडपा, पण तेव्हाही निश्चितच त्यांच्या मनात विठ्ठलभक्त विठेसारखे बोल घुमले असतील, ‘तुझी सत्ता आहे देहावरी समज, माझेवरी तुझी किंचित नाही.’

अलीकडेच पाचेक वर्षांपूर्वी ‘बेगमजान’ नावाचा सिनेमा आला होता. हिंदुस्थान आणि पाकिस्तान फाळणी होताना आपला कोठा जाणार म्हटल्यावर त्या कोठय़ाची मालकीण असलेली बेगमजान ठामपणे उभी राहते हातात बंदुक घेऊन आणि म्हणते, “मेरा जिस्म, मेरा घर, मेरा देश और मेरे नियम.’’ म्हणजे या साऱयावर फक्त आणि फक्त माझाच अधिकार.

…तर विठाबाई नारायणगावकर आणि हंसा वाडकर याच परंपरेतल्या. परंपरेने कलावंत म्हणून मान्यता पावलेल्या समाजातल्या. मात्र त्यांनी आपली कला कितीही शुद्धपणे आणि सात्त्विकपणे रसिकांवर निछावर केली तरी पुरुषांच्या बुभुक्षित नजरा तयारच असायच्या त्यांना टिपायला. परिणामी कधी स्वेच्छेने, तर कधी अनिच्छेने विठाबाई आणि हंसाबाई दोघींनी आपले आयुष्य उधळून दिले. कुणी लग्न करून फसली, तर कुणी बिनलग्नाची. परंतु असे बेभरवशी-बेताल वागणे जगण्याच्या मुळावर येतेच आणि मग आयुष्याची पार लक्तरे होऊन जातात… नि बघता बघता एका तालेवार आयुष्याची शोकांतिका होऊन जाते. विठाबाई आणि हंसाबाई दोघींचे आयुष्य हे एका समृद्ध कलावंताचेच होते. मात्र दोघींच्या आयुष्याचा शेवट तसा शोकात्मच झालेला दिसतो. मात्र या दोघीही कधीच आपल्या नशिबाला दोष देत बसल्या नाहीत. आयुष्य जसे समोर आले तसे त्या स्वीकारत गेल्या, त्याविषयी त्यांनी कधीच तक्रार केली नाही. म्हणूनच मुंबई विद्यापीठाच्या ‘अकॅडमी ऑफ थिएटर आर्टस्’च्या विद्यार्थांनी नुकतेच रंगभूमीवर सादर केलेले ‘विठाबाई’ आणि ‘आविष्कार’ने रंगभूमीवर आणलेले ‘सांगत्ये ऐका’ या दोन नाटय़कृती म्हणजे एकप्रकारे त्या दोघींच्या आयुष्याचा साजरा केलेला उत्सवच आहे.

या दोघींच्या आयुष्याची चित्तरकथा पाहून कुणीही त्यांची कीव करणार नाही याची खबरदारी या दोन्ही नाटय़कृतींच्या लेखक-दिग्दर्शकांनी घेतलेली आहे. ‘विठाबाई’ या नाटय़कृतीचे लेखक आहेत संजय जीवने आणि या नाटकाची रंगावृत्ती व दिग्दर्शन केले आहे डॉ. मंगेश बनसोड यांनी, तर ‘सांगत्ये ऐका’ची रंगवृत्ती हंसा वाडकर यांच्या याच नावाच्या छोटेखानी आत्मकथनावरून विश्वास सोहोनी यांनी तयार केली असून दिग्दर्शनही त्यांचेच आहे. या दोन्ही नाटय़कृतींची प्रकृती भिन्न हे. ‘विठा’ ही नाटय़कृती ‘अकॅडमी ऑफ थिएटर आर्टस्’च्या विद्यार्थांनी पूर्ण नाटक स्वरूपात सादर केली आहे, तर ‘सांगत्ये ऐका’ हे एकपात्री प्रयोगासारखे सादर केलेले आत्मकथन आहे आणि हंसा वाडकर यांची दमदार भूमिका साकारली आहे मानसी कुलकर्णी यांनी. या दोन्ही नाटय़कृतींनी एकप्रकारे आपापल्या नायिकांना पुरेपूर न्याय दिला आहे. कारण विठाबाई काय किंवा हंसाबाई काय दोघींचा नखरा, ऐट, हजरजबाबीपणा आणि वेळप्रसंगीची हतबलता सारे काही या नाटय़कृतींमध्ये नेमके टिपण्यात आले आहे.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एकप्रकारचा करारीपणा, हजरजबाबीपणा होता. विठाबाईंच्या हजरजबाबीपणाचा एक किस्सा खुद्द निळू फुले यांनी सांगितला होता, विठाबाईंचा कुठलासा वग सुरू होता. त्या वगात विठाबाईंच्या पात्राच्या तोंडी एक वाक्य होते, “जा रे त्या पठाणाला बोलवून आण.’’ विठाबाईंनी ते वाक्य म्हणताच समोरच्या प्रेक्षकातील कुणीतरी एक वात्रट जोराने ओरडले, “आणा आणा पठाणाला आणा, बाईंना पठाण लागतो.’’ त्याच्या त्या वाक्यासरशी विठाबाई क्षणभर थांबल्या त्यांनी त्या रसिकाला नीट निरखून, पारखून घेतले आणि मग आपले वाक्य त्यांनी पुन्हा एकदा घेतले. मात्र या वेळी त्या म्हणाल्या, “जा रे, एक नको दोन पठाण घेऊन ये.’’ यावर समोरचा कलाकार गोंधळला आणि म्हणाला, “दोन?’’ त्यावर विठाबाई पटकन म्हणाल्या, “हो दोन. एक माझ्यासाठी आणि दुसरा आता जो मध्ये बोलला त्याच्या आयशीसाठी.’’ त्याबरोबर तो वात्रट रसिक एकदम गपगार झाला, तर बाकीच्या रसिकांनी विठाबाईंच्या हजरजबाबीपणाला जोरदार टाळय़ा वाजवून दाद दिली. व्यक्तिमत्त्वातला आणि जिभेवरचा हा तिखट जाळ विठाबाईंनी कायम जपला.

हंसाबाईदेखील अशाच जिगरबाज होत्या. संसाराच्या असोशीने त्यांनी बंदरकर नावाच्या गृहस्थांशी लग्न केले खरे, परंतु जेव्हा तेच बंदरकर केवळ संशयावरून त्यांना उठताबसता मारहाण करू लागले, तेव्हा बाईंनी ठरवले काहीही चुकीचे न करता मार खाल्ला ना, आता तसे वागूनच दाखवायचे आणि मग हंसाबाई प्यायला लागल्या. बेफिकीर वागायला लागल्या. पुढच्या आयुष्यात तर हंसाबाईंनी कहर केला. अर्थात या साऱयाचे परिणाम त्यांना आयुष्यात भोगावेही लागले. मात्र ते त्यांनी निमूट सहन केले. त्या आपल्या आयुष्याला दोष देत बसल्या नाहीत.

स्वतंत्र बाण्याच्या व्यक्ती अशा असतात विठाबाई, हंसाबाईंसारख्या. पण केवळ विठाबाई किंवा हंसाबाईच नव्हे तर पांढरपेशा समाजाने ज्यांना ज्यांना बाजारबसवी, रंडी, तवायफ, देवदासी, भावीण-नायकीण म्हटले त्या साऱयाजणींनी आपापली कला जपतानाच आपापली स्वतंत्र वृत्तीही जपली. महत्त्वाचे म्हणजे आयुष्याच्या वाटचालीत शेवटी शेवटी त्यांच्याकडे गमावण्यासारखे काही उरतच नाही अन् तरीही त्या एवढय़ा घरंदाज असतात की, आपल्या या परिस्थितीला त्या अन्य कुणाला जबाबदार धरत नाहीत. ‘आपुलाचि वाद आपणासि’ या न्यायाने त्या एकटय़ाच आयुष्याशी झगडत राहतात आणि काळाच्या पटलावरून निघून गेल्यावरही काळापेक्षा दशांगुळे वरच उरतात. नुकतीच रंगभूमीवर सादर झालेले ‘विठाबाई’ काय किंवा ‘सांगत्ये ऐका काय’ त्याचेच तर निदर्शक आहे.

[email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

त्याने माझी फसवणूक केली, मुलीखातर मला..; संजय कपूरच्या पत्नीचा खुलासा त्याने माझी फसवणूक केली, मुलीखातर मला..; संजय कपूरच्या पत्नीचा खुलासा
अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूरने 2022 मध्ये ‘फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स’ या नेटफ्लिक्सवरील वेब सीरिजमध्ये तिच्या खासगी आयुष्याविषयी...
सोळाव्या वर्षी लग्न, सेल्स गर्लचं काम, अपघातात जीव गमावलेली पवित्रा जयराम कोण होती?
‘या’ कुटुंबातील एकटा मुलगा कमावतो कोट्यवधींची माया, जगतात रॉयल आयुष्य
‘आश्रम’ फेम अभिनेत्री ईशा गुप्ता स्पॅनिश उद्योजकाला करतेय डेट, एग्स फ्रीज करण्याबद्दल अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य
महिन्याभरात दोन वेगवेगळ्या मतदारसंघात मतदान करण्याचा चमत्कार, चंद्रपुरातील मतदानाची चर्चा
माझ्यासमोर आव्हान नाही तर विजयाचा विश्वास आहे; चंद्रकांत खैरे यांचा दावा
कोपरगावमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत 33 टक्के मतदान उत्स्फूर्त प्रतिसाद